ठाणे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पूर्णेकर यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी बुधवारी रात्री कोलशेत परिसरात मेणबत्ती मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये कोलशेत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

प्रदीप पूर्णेकर यांची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून तसेच चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर ठाण्यात राजकीय वातावरण तापले असून, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून आणि समर्थकांकडून शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

पूर्णेकर यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मेणबत्ती मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी रात्री कोलशेत परिसरात हा मार्च काढण्यात आला. यामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मात्र, या मार्चमुळे कोलशेत परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.