ठाणे – कोकणातील जगप्रसिद्ध कातळ शिल्पांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि मुलांमध्ये प्राचीन इतिहासाबाबत उत्सुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ठाण्यात विशेष कातळ शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणात आढळणारी २० हजार वर्षांपूर्वीची ही शिल्पकला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना मिळत आहे.

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्यावतीने कोकणातील २० हजार वर्षे जुन्या कातळशिल्पांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन २६ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे. जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉ. बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनादरम्यान डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले, या शिल्पनिर्मितीसाठी प्रसिद्ध कलाकार सदाशिव कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आहे.

महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिल्प तयार करत या प्रक्रियेत सहभाग घेतला. या उपक्रमात प्रा. अंकुर काणे आणि प्रा. साईश्रुती भट्ट यांच्यासह सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून कोकणातील कातळ शिल्पांची संकल्पना ठाण्यात आणण्यात आली आहे. कलात्मकतेसोबतच ऐतिहासिक माहितीही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया

कातळ शिल्प ही केवळ कोरीव काम नसून जवळजवळ २० ते ३० हजार वर्षांपूर्वी मानवाने निर्माण केलेली एक प्राचीन कला आहे, हे विद्यार्थ्यांना समजावे. ठाण्यात नैसर्गिक कातळ नसतानाही येथे मातीच्या परिसरात हाताने कातळाची निर्मिती करून त्यावर शिल्प साकारण्यात आली आहेत, ही या प्रदर्शनाची विशेष बाब आहे. – डॉ. महेश बेडेकर.

ज्या काळात ही शिल्पे निर्माण झाली त्या काळात मानवाकडे धातू उपलब्ध नव्हते. त्यामुळे कठीण खडकावर काम करणे शक्य नसल्याने लेटेराईटसारख्या तुलनेने मऊ खडकावर कोरीव काम करण्यात आले. त्या काळात वापरात असलेल्या दगडी हत्यारांपैकी ‘ब्युरिन’ नावाच्या साधनाचा वापर झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. – प्रा. अंकुर काणे.