ठाणे : शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धेश (सिद्धू) अभंगे याच्यावर रविवारी रात्री कोपरी पोलीस ठाण्यात हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिद्धू अभंगे याच्यावर यापूर्वी काही गुन्हे देखील दाखल होते. सध्या तो शिंदे गटाचा शिर्डी लोकसभेचा युवासेना संपर्कप्रमुख असल्याचा दावा करतो. सिद्धू अभंगे याच्यावरील हल्ल्यानंतर कोपरी भागात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार सिद्धू अभंगे आणि काही कापड व्यवसायिक महिलांचे वाद झाले होते. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. या वादानंतर महिला आणि तिच्या ओळखीच्या व्यक्तीने सिद्धू अभंगे याला पोलीस ठाण्यात मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. पोलिसांनी येथील वाद मिटविला. मात्र या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोण आहे सिद्धू अभंगे?

सिद्धू अभंगे हा ठाण्यातील सिद्धार्थ नगर या भागात पूर्वी राहत होता. त्याच्याविरोधात मारहाणीसारखे अनेक गुन्हे दाखल होते. त्याचे समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात फाॅलोवर्स आहेत. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात त्याने कोपरी भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला होता. या गणेशोत्सवाला आमदार, नगरसेवकांनी भेट दिली होती.