ठाणे : कोपरी पोलीस ठाण्यात झालेल्या हाणामारीप्रकरणी शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धू अभंगे याच्यासह पाच जणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सॲप समूहातील वादातून हा प्रकार घडला. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिद्धू अभंगे याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सिद्धू अभंगे, त्याची पत्नी आरती अभंगे, विशाल चेखालिया, तुलसी अंबालिया व सोनल वाघरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सिद्धू अभंगे हा शिंदे गटाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा युवासेना संपर्कप्रमुख असल्याचा दावा करतो. ‘कोपरीचा महाराजा’ या व्हॉट्सॲप समूहात विशाल चेखालिया हा मारहाण करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करत सिद्धू अभंगे व त्याची पत्नी आरती हे रविवारी रात्री सुमारे ११ वाजता कोपरी पोलीस ठाण्यात गेले होते.

त्यानंतर कोपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रेश्मा कदम यांनी विशाल याला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली. त्यानुसार रात्री सुमारे ११.२० वाजता विशाल, त्याची बहीण तुलसी व शेजारी राहणारी सोनल हे तिघे पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी विशाल हा सिद्धू अभंगे व त्याच्या पत्नीकडे पाहून शाब्दिक वाद घालत होता. पोलिसांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर वाद वाढला व पोलिसांसमोरच दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम १९४ (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून आपापसांत झुंज व दंगल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.