ठाणे : पुर्व म्हणजेच कोपरी रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील वाईन शॉपमधून मद्य घेऊन उघड्यावरच प्राशन केले जात असून या मद्यधुंदांकडून रस्त्यांवरून जाणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करण्याबरोबर छेडछाडीचे प्रकार वाढले होते. या संदर्भात तक्रारी येऊ लागल्याने शिंदेच्या शिवसेनेतील शिवसैनिकांनी त्याठिकाणी जाऊन छेडछाड करणाऱ्या मद्यधुंदांना चोप देण्याबरोबरच वाईन शॉप मालकालाही जाब विचारून सक्त ताकीद दिली.
ठाणे पुर्व म्हणजेच कोपरी रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु या रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन्स समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोपरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो. हे तरुण वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पित बसतात आणि परिसरातून ये-जा करणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करतात. त्याची छेडछाड करून त्यांना त्रास देतात. अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या. मात्र, पोलिसांकडूनही फारशी कारवाई होत नव्हती. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने मद्यधुंद तरुणांचे धाडस वाढतच होते.
कोपरी भागातील एक तरुणी शनिवारी मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात होती. त्यावेळी मद्यधुंद तरुणांनी तिची छेड काढली. घाबरलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने धाडस दाखवत ही माहिती तत्काळ एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकली. यानंतर ही माहिती स्थानिक शिवसैनिकांपर्यंत पोहचली आणि त्यांनी मद्यधुंद तरुणांना धडा शिकवायचे ठरविले. शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, संतोष बोडके, संतोष पांचाळ, गणेश मुकादम, विकास पाटील, मनीष मुकादम, तुषार परब आणि अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिसरात शोधमोहीम राबवत संबंधित तरुणांना गाठून त्यापैकी एकाला पकडून चोप देत इतरांना इशारा दिला. यानंतर त्यांनी वाईन शॉपच्या दुकानदारालाही जाब विचारला. दुकानासमोरच ग्राहकांचे दारू पिणे आणि त्यामुळे महिलांना त्रास होणे, हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीद दिली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी स्थानिक महिलांकडून मात्र आनंद व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना आळा बसणे अत्यंत गरजेचे असून, महिलांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासनानेही संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
