कल्याण : नाशिक येथील एका प्रवाशाचा विदर्भ एक्सप्रेसमध्ये लॅपटाॅपसह दीड लाखाहून अधिक किमतीचा किमती चोरीला गेलेला ऐवज कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, अडीच तासाच्या आत ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सोमवारी हा प्रकार विदर्भ एक्सप्रेसमध्ये ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडला होता.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिलेली माहिती, अशी की नाशिक येथे राहणारे मयूर दिलीप अमृतकर (३०) हे आपल्या कामानिमित्त सोमवारी ठाणे शहरात आले होते. ठाण्यातील आपले काम उरकल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये बसले. स्लीपर कोच पाचमध्ये दरवाजाजवळच्या आरक्षित आसनावर त्यांनी आपली लॅपटाॅप, रोख रक्कम, इतर ऐवज असलेली पिशवी ठेवली होती. एक्सप्रेसमध्ये बसून स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी आपली जवळील पिशवी सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पिशवी आढळली नाही.

एक्सप्रेसमध्ये चढताना हातात असलेली पिशवी अचानक गायब झाल्याने मयूर अमृतकर यांनी डब्यात शोध घेतला. त्यांना पिशवी आढळली नाही. त्यामुळे आपण डब्यात चढल्यावर आपल्या पाठोपाठ पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने हे काम केले असावे, असा संशय त्यांनी घेतला. तोपर्यंत कल्याण रेल्वे स्थानक आले. पिशवीमध्ये लॅपटाॅप इतर साहित्य होते. अमृतकर यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दाखल केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी तात्काळ तपास पथके तयार केली. त्यांनी ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यानचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रण तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेतील साहाय्यक पोलीस निरीक्षक वाणी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, शोध पथकाचे हवालदार अक्षय पाटील यांनी चोरट्यांना चोरी केल्यानंतर अडीच तासाच्या आत चोरीच्या सामानासह अटक केली.

पंचासमक्ष पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे मयूर अमृतकर यांचा चोरीला गेलेला ऐवज सापडला. पिशवीत लॅपटाॅप, कॅमेरा, इतर तांत्रिक साहित्य असा एकूण १ लाख ६५ हजाराचा ऐवज पिशवीत होता. विदर्भ एक्सप्रेसमधून आपण हा ऐवज चोरल्याची कबुली चोरट्यांनी पोलिसांना दिली. मिळालेला ऐवज पोलिसांनी मयूर अमृतकर यांना स्वाधीन केला. याबद्दल मयूर यांनी समाधान व्यक्त केले.