Political Influence and Police Appointments in Thane: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेचे आणखी किती धिंडवडे निघणार? काही दिवसांपूर्वी याच ठाण्यात पळून जाणाऱ्या आरोपीने केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू होतो. त्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली जाते आणि आता प्रदीप पुर्णेकर यांची हत्या. पुर्णेकर यांच्या हत्येमागचे कारण काय, हे तपासांती समोर येईलच. पण या घटनेनंतर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबाबत शंका निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत ठाण्याचे पोलीस प्रशासन कुणीतरी पडद्याआडून चालवत आहे का, इतके येथील पोलीस हतबल आणि कमजोर दिसू लागले आहेत. गावगुंडांची वाढलेली दहशत, हिस्ट्री शिटर चेहऱ्यांचे पोलीस मुख्यालयासमोरच लागणारे मोठाले बॅनर, गल्लीतील सोम्या-गोम्याच्या वाढदिवशी मुख्य रस्ते अडवून रात्री-अपरात्री होणारी फटाक्यांची आतषबाजी आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत या सर्व गणंगांना राजाश्रय देणारी तगडी व्यवस्था यामुळे ठाण्याचा सामाजिक ऱ्हास खरे तर केव्हाच वेगाने सुरू झाला आहे. या व्यवस्थेत राजसत्तेचा आदेश मुग गिळून मानणारी यंत्रणा इतकीच काय ती ठाणे पोलीस दलाची ओळख बनू लागली आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत आशुतोष डुंबरे. पोलीस दलातील एक चांगला अधिकारी म्हणून आपण त्यांचे नाव निश्चितच घेऊ शकतो. परंतु डुंबरे यांच्यासारख्या कर्तृत्वाने चांगला इतिहास राहिलेल्या अधिकाऱ्याला ठाण्यात मात्र आपल्या कामाची छाप का सोडता आली नाही, असा प्रश्न त्यांच्या पोलीस कारकिर्दीचे नेहमीच औत्सुक्य राहिलेल्यांना पडल्याशिवाय राहात नाही. डुंबरे यांच्यापाठोपाठ सह-आयुक्तासारखे महत्त्वाचे पद भूषविणारे ज्ञानेश्वर चव्हाण, पंजाबराव उगले हेदेखील एकेकाळी तडाखेबंद अधिकारी म्हणून ओळखले जात. हे दोघेही आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. निवृत्तीपूर्वीचा बराचसा काळ या दोघांनी ठाणे पोलीस दलातच काढला. ठाण्याची वेस ओलांडून अगदी मुंबईतही या दोघांना जावेसे वाटले नाही. ठाणे पोलीस दलात हे दोघे अधिकारी इतके का रमले, हा खरे तर संशोधनाचा विषय. मात्र या एरवी कार्यक्षम म्हणविल्या जाणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या, हा इतिहास आता कुणालाही पुसता येणार नाही. कुणीतरी गल्लीगुंड उठतो, दादागिरी करतो, कुठेही खून पडतात, पोलीस ठाण्यात व्यापारी महिला गुंडाला चोपतात, सत्ताधारी पक्षाचा आमदार नशेखोरीच्या अड्ड्यांची यादी पोलीस आयुक्तांना सादर करतो आणि इतकं करूनही त्यावर काहीही कारवाई होत नाही. हे सगळे घडतंय ते याच काळात.
कधी काळी सुसंस्कृत वगैरे म्हणविल्या जाणाऱ्या ठाण्याची ही दशा खरे तर सजग मनांना अजिबात पाहवणारी नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते देवेंद्र फडणवीस ठाण्याकडे अजिबात पाहायला तयार नाहीत, अशी चर्चा आता त्यांच्याच पक्षात दबक्या आवाजात सुरू आहे. फडणवीसांनी जर ठाण्याकडे गांभीर्याने पाहिले असते तर जुन्या ठाण्याचे त्यांच्याच पक्षाचे आमदार संजय केळकर यांचे तरी पोलिसांनी ऐकले असते. पण तसे होताना दिसत नाही. केळकर प्रत्येक महिन्यात ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटतात. त्यांच्याकडे नशेखोरीच्या अड्ड्यांची माहिती सोपवतात. ठाणे शहराच्या अनेक भागांमध्ये लेडीज बार, पब्ज वगैरेचा धांगडधिंगा अगदी पहाटेपर्यंत सुरू असतो. या आस्थापनांची यादीही केळकर यांनी पोलिसांकडे सोपवली आहे. या जागा ठाण्यात नशेखोरी, गुंडगिरी, हप्तेखोरीचे नवे केंद्र ठरू लागल्या आहेत. या आस्थापनांमध्ये अग्निशमनाच्या नियमांची ऐशीतैशी होत असल्याच्या तक्रारीही आहेत.
एखादी आग लागली तर मोठी दुर्घटना घडेल, अशा ढीगभर तक्रारींची पत्रे महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे पाठवली गेली आहेत. पोलीस मात्र कुणाचे काही ऐकायला तयार नाहीत. केळकरांसारख्या जुन्या जाणत्या आमदारांच्या तक्रारी जेथे हसण्यावारी घेतल्या जातात, तेथे सर्वसामान्यांची काय अवस्था असेल, हे खरे तर कुणी सांगायला नकोच. दररोज अजस्त्र अशा वाहतूक कोंडीने पिचलेला ठाणेकर ही कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न अधूनमधून विचारत असतो. या आघाडीवरही ठाणे पोलीस दल पूर्णपणे अपयशी आहे. मानपाडा भागात प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेविषयी विचारले जाणारे प्रश्न अधिक टोकदार झाले आहेत. परंतु येथील कायदा-व्यवस्थेचे होत असलेले अवमूल्यन हे केवळ एका घटनेपुरते मर्यादित नाही. गेल्या पाच-सहा वर्षांत त्याच-त्या अधिकाऱ्यांना दिला गेलेला राजाश्रयाचे परिणाम आता हे शहर भोगत आहे.
सर्वच नियुक्त्यांमध्ये शिंदे पॅटर्न?
राज्यातील पोलीस खात्यावर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असला तरी ठाणे पोलीस दल मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडून देण्यात आले आहे. कुणी काहीही म्हणोत, ठाण्यातील पोलीस दलातील साध्या शिपायाच्या नियुक्तीवरही ठाण्याचाच प्रभाव चालतो, हे आता लपून राहिलेले नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला ठाण्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस नियुक्त्या झाल्या. या सर्व नियुक्त्यांवर एकनाथ शिंदे यांची ठसठशीत छाप दिसून आली. शिंदे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यांमध्ये तसेच शहरांमध्ये करण्यात आल्या होत्या. काही अधिकाऱ्यांना तर अगदीच साइड पोस्टिंग देण्यात आल्या होत्या. या आघाडीवर फडणवीस यांचे गृहखाते काही तरी वेगळे करू पाहतेय, अशी चर्चाही आठवडाभर रंगली.
मात्र काही दिवसांतच हेच चित्र बदलले. शिंदे यांना हवे असलेले सगळे अधिकारी पुन्हा ठाण्यात आणले गेले. काही पोलीस अधिकाऱ्यांची ठाण्यातून इतर शहरांमध्ये झालेली बदली रद्द करण्यात आली. गृहनिर्माण विभागात बदली झालेले पंजाबराव उगले यांची बदली रद्द करण्यात आली. त्यांना ठाण्यात थेट सह-आयुक्त करण्यात आले. मूळचे वाई, साताऱ्याचे असलेले अमरसिंह जाधव यांना डायल ११२३ मधून पुन्हा ठाण्यात आणले गेले. त्यांच्याकडे गुन्हे अन्वेषण विभाग सोपविण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘ठाणे-सुरत’ मार्गाचे राखणदार असलेले तेथील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना पुन्हा ठाण्यात आणले गेले. विवेक पानसरे, पवन बन्सोड यांनाही मोक्याची पदे दिली गेली. शिंदे यांच्या ठाण्यात सर्व परिमंडळांमध्ये त्यांचे निकटवर्तीय अधिकारी नेमले गेले आहेत. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि या पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे, हा नियम ठाण्यात अशा अर्थाने अजिबात लागू नाही. अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण-डोंबिवली भागातही अधिकारी नेमले गेलेत ते ठाण्याच्या प्रभावातूनच.
राजकीय द्वेष टोकाला?
ठाणे शहराला निसर्गासोबतच समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे ठाण्याने स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण केली. राजकीय क्षेत्रातही दिवंगत आनंद दिघे, प्रकाश परांजपे, वसंत डावखरे, बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासारख्या लोकप्रिय आणि सर्वपक्षीय संबंध जपणाऱ्या नेत्यांची परंपरा या शहराने पाहिली. यातल्याच काही नेत्यांनी चालवलेल्या ‘समांतर न्याय व्यवस्थे’मुळे ठाणेकर कसे सुरक्षित होते, याचे किस्से आता चवीने चघळले जातात. मग याच नेत्यांचे पट्टशिष्य म्हणवून घेणारे नेते अशी जरब का ठेवू शकत नाहीत? सध्याच्या बेदरकार व्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण उरले नाही की तेच अशी व्यवस्था निर्माण करू पाहतात, हे शोधण्याची गरज आहे. पण त्याआधी ठाण्याच्या पोलीस दलाची जरब गुन्हेगारांत बसण्याची नितांत आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस दलाचे गृहखाते आहे. त्यामुळे ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे उत्तर त्यांनाही शोधावे लागेल.
असुरक्षित घटनांचा महिन्याचा आलेख
* पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वी रविवारी कोपरी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धू अभंगे याच्यासोबत हाणामारी झाली होती. या घटनेची मोबाईल चित्रफीत प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धू अभंगे याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
* २४ सप्टेंबरला चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर हे आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपीने त्यांच्या दिशेने वीट फेकली. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
* वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक ३४ परिसरात ११ सप्टेंबरला पूर्ववैमनस्यातून संदीप साळवे यांची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर अनेक खोलवर घाव होते. हल्ल्यानंतर काही वेळ ते रक्ताच्या थारोळ्यात उभे. परंतु त्यांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही.
* ७ सप्टेंबरला कापूरबावडी भागात स्वच्छतागृहात जाण्याच्या कारणावरून राजू गुतराथी यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता.
पोलीस यंत्रणा सक्षम आहे. आतापर्यंत जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे १०० टक्के उघडकीस आले असून आरोपी अटक झाले आहेत. तसेच, त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू असते. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. – डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सहआयुक्त, ठाणे पोलीस.
