ठाणे : ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनलवरील एका वकिलाने खटला चालविण्यासाठी तक्रारदाराकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वकिलाला ताब्यात घेतले असून, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात धनादेश अनादराची नऊ प्रकरणे दाखल आहेत.

तक्रारदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मोफत कायदेशीर मदत मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार प्राधिकरणाने पॅनलवरील एका वकिलाची नियुक्ती केली होती. दरम्यान, संबंधित वकिलाने तक्रारदाराकडून शुल्काच्या नावाखाली एक हजार रुपये घेतले. तसेच, ऑनलाइन माध्यमातून ४ हजार ५०० रुपये त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करून घेतले. मात्र, खटल्यांच्या कामकाजादरम्यान संबंधित वकिलाला या प्रकरणांसाठी प्राधिकरणाकडून मानधन मिळणार असल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली. तरीही वकील वारंवार शुल्काची मागणी करीत असल्याने तक्रारदारांनी २ नोव्हेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ९.४७ वाजता वर्तकनगर परिसरात कारवाई केली. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना वकिलाला ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्याच्या पत्नीने लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याने तिला नोटीस बजावून सोडून देण्यात आले. याप्रकरणी दोघांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.