Mamledar Misal Thane Historical Shop Demolished: ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी आणि अनेक राजकीय दिग्गजांच्या भेटीने गाजलेली ‘मामलेदार मिसळ’ आता जुनी वास्तू आता इतिहासजमा झाली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आले असून यानिमित्ताने शहराच्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याचे चित्र आहे. मामलेदार मिसळ परिसरातच दुसर्‍या वास्तूत सुरू करण्यात आले असले तरी जुनी वास्तु आता ठाणेकरांच्या केवळ आठवणीत उरली आहे.

ठाणे तहसील कार्यालयाच्या आवारात मामलेदार मिसळचे दुकान होते. साधारण १९५० च्या दशकात सुरू झालेलले हे छोटस दुकान हळूहळू ठाण्याची ओळख बनले. त्या काळात तहसील कार्यालयात काम करणारे अधिकारी, मामलेदार येथे मिसळ खायला यायचे. त्यातूनच मामलेदार मिसळ हे नाव प्रचलित झाल्याचे बोलले जात असून या नावाचे पुढे हा ठाण्याचा एक ब्रँड तयार झाला. या मिसळची तिखट, झणझणीत कट आणि घरगुती पद्धतीची ही चवच लोकांना भावली. अगदी छोट्या जागेत हे दुकान होते. यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत येथे मिसळ खाण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागायच्या. काल-परवापर्यंत हे चित्र कायम होते.

या ठिकाणी अनेक मोठ्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसारख्या दिग्गजांनी येथे मिसळीचा आस्वाद घेतला. राज ठाकरे हे ठाण्यात कार्यक्रमानिमित्ताने जेव्हा-जेव्हा येतात, तेव्हा-तेव्हा ते या मिसळीचा आस्वाद घ्यायचे. राजकीय नेतेच नव्हे तर इतर क्षेत्रातील व्यक्ती, ठाणेकर आणि ठाण्याबाहेरील लोक इथे मिसळचा आस्वाद घेण्यासाठी यायचे. हे ठिकाण केवळ खाण्यापुरते मर्यादित न राहता, शहराच्या संस्कृतीचा भाग बनले होते.

जागेचा पुनर्विकास

आता तहसील कार्यालय, ठाणेनगर पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी हा परिसर मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील ‘मामलेदार मिसळ’चे दुकानही पाडण्यात आले. तहसील कार्यालय सध्या पार्किंग प्लाझा येथे तर, ठाणेनगर पोलीस ठाणे तात्पुरते हलवण्यात आले असून मामलेदार मिसळही परिसरातील दुसऱ्या वास्तूत हलविण्यात आल्याचे समजते.

पुनर्विकासानंतर इथे मामलेदार मिसळचे नवे दुकानही सुरू होईल. पण, जुनी वास्तू मात्र आता इतिहासजमा झाली आहे. नव्या इमारती उभ्या राहतील, सुविधा वाढतील. पण ‘त्या’ मिसळची चव, तिथे रंगणाऱ्या गप्पा आणि तो माहोल पुन्हा मिळेल का? हा प्रश्न मात्र प्रत्येक ठाणेकराच्या मनात राहणार आहे.