ठाणे : ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलास नगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन तसेच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून इथे बिबट्यासह अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचे यापूर्वी अनेकदा आढळून आले असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरालगत असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
असे असतानाच, आता वागळे इस्टेट येथील कैलास नगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. तसेच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
https://www.facebook.com/share/r/1SmrbWKAQR
नगरसेवकाचे नागरिकांना आवाहन
शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्री उशिरा एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच, कचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्यप्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रतिनिधींना कळवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सहा महिन्यात बिबट्या कुठे आढळला?
ठाणे शहरात अलीकडील काळात बिबट्याच्या वावराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये मानपाडा येथील इडेन वूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्याने भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पोखरण रोड क्र. २ परिसरातील बेथनी हॉस्पिटलजवळील बांधकाम साईट आणि सन लाईट इमारत परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुढे जानेवारी २०२६ मध्ये वागळे इस्टेटमधील वारली पाडा भागात बिबट्याने लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला, ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती.
