scorecardresearch

ठाणे : भांड्यात तोंड अडकलेल्या बिबट्याची दोन दिवसानंतर अखेर सुटका

दोन दिवस अन्नपाण्याविना फिरणाऱ्या या बिबट्याची प्रकृती खालावली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

leopard was finally released after two days

पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यात तोंड घालणाऱ्या बिबट्याचे डोके भांड्यात अडकण्याचा प्रकार रविवारी बदलापूर जवळील गोरेगाव भागात समोर आला होता. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याचा शोध घेण्यात वन विभागाला यश आले असून मंगळवारी सायंकाळी या बिबट्याची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाच्या मदतीने वनविभागाने सुटका केली आहे. दोन दिवस अन्नपाण्याविना फिरणाऱ्या या बिबट्याची प्रकृती खालावली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

गोरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी एका तरुण बिबट्याचे डोके पाण्याच्या प्लास्टिकच्या भांड्यात अडकले होते. गेल्या दोन दिवसांपासून हा बिबट्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी भटकत होता. वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक त्याची सुटका करण्यासाठी त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गोरेगाव भागातच बिबट्या आढळून आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकाने त्याला बेशुद्ध करत ताब्यात घेतले. त्यानंतर भांड्यापासून त्याची सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून अन्नपाण्याविना फिरणाऱ्या या बिबट्याची प्रकृती खालावल्याची माहिती उपवनसंरक्षक तुळशीराम हिरवे यांनी दिली आहे. त्यामुळे घटनास्थळी रुग्णवाहिकेत त्याच्यावर उपचार केले जात आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हिरवे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्लास्टिकच्या भांड्यात डोके घेऊन फिरणार्‍या बिबट्याची अखेर सुटका झाली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane leopard was finally released after two days abn 97 tlsp 0122