ठाणे : परराज्यातून औषधांच्या बनावट चलन (इनव्हॉइस) च्या आधारे दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत सुमारे १ कोटी ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाहनचालक पर्गत सिंग कर्तार सिंग आणि अमरीतबिर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. औषधांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने परराज्यातील म्हणजेच गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार, मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव टोल नाका ते माजिवाडा रोड परिसरात पथकाने ५ मे रोजी सापळा रचला होता.

सुमारे सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या कंटेनर (क्रमांक एमपी ०९ जीजी ७९३०) हे वाहनाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान वाहनात पुढे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडून पाहिले असता, त्यामध्ये रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिलीच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. एकूण १४५० बॉक्स (१२५२८ लिटर) विदेशी मद्य पथकाने जप्त केल्या. तसेच संबंधित कंटेनरसह एकूण १,६६,११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करून वाहनचालक पर्गत सिंग कर्तार सिंग आणि अमरीतबिर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक (ठाणे-१) प्रवीण तांबे, प्रभारी उपअधीक्षक (ठाणे-१) आनंद पवार तसेच उपअधीक्षक (ठाणे-१) रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. पी. धनखेडे, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व्ही. जी. थोरात, तसेच पी. एस. नागरे, पी. पी. महाजन, डी. के. पाटील, एस. एस. यादव, पी. पी. पाटील, एम. जी. शेख आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.