ठाणे : गेल्या शंभर वर्षांत एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ठाणे शहराला मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी २०२७ मध्ये पुणे येथे होणाऱ्या १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाण्यातील साहित्यिकाची निवड करावी, अशी मागणी ठाण्यातील साहित्यिक, रसिक-वाचक, साहित्यप्रेमी तसेच सांस्कृतिक आणि सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.
ठाणे शहराला औद्योगिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहराची ओळख असली, तरी त्याला समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपराही लाभली आहे. शहरात अनेक नामवंत साहित्यिक वास्तव्यास असून कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. अनंत देशमुख, प्रवीण दवणे, अशोक बागवे, अशोक समेळ, अरुण म्हात्रे यांच्यासह अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ठसा उमटवला आहे.
शहरातील साहित्यिक संस्था, वाचनालये, साहित्यिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ठाण्याचे साहित्यविश्व सातत्याने सक्रिय आहे. त्यामुळे ऐतिहासिक १००व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ठाण्यातील साहित्यिकाचा विचार करून शहराच्या साहित्यिक योगदानाचा सन्मान करावा, अशी भूमिका ठाणेकरांकडून मांडण्यात येत आहे.
स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानसह साहित्यिक, साहित्यरसिक, वाचक, साहित्यप्रेमी, सांस्कृतिक, सिने-नाट्य क्षेत्रातील कलाकार, उद्योजक, डॉक्टर, वकील आणि अभियंते अशा विविध क्षेत्रांतील नागरिकांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेला पत्र पाठवून ठाण्यातील साहित्यिकाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्याची मागणी केल्याची माहिती स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी दिली.
शंभरावे साहित्य संमेलन ठाणे शहराला मिळावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, आता हे संमेलन पुण्यात होत आहे. त्याबद्दल आमची कोणतीही नाराजी नाही. पण किमान या ऐतिहासिक शंभराव्या संमेलनाचे अध्यक्षपद तरी ठाणे शहरातील साहित्यिकाला देऊन ठाण्याच्या साहित्यिक परंपरेचा सन्मान करावा.- विद्याधर ठाणेकर, अध्यक्ष, स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान
