scorecardresearch

Premium

ठाणे विभागाच्या अंतिम फेरीत एकांकिकांचा ‘चौफुला’

लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा आठ केंद्रांवर अस्तित्व या संस्थेच्या मदतीने सुरू आहे.

ठाणे विभागाच्या अंतिम फेरीत एकांकिकांचा ‘चौफुला’

चार एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीत निवड; ११ ऑक्टोबरला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये अंतिम फेरी
राज्याच्या सांस्कृतिक पटलावरील मोक्याचे ‘ठाणे’ असलेल्या ठाणे विभागातील ११ महाविद्यालयांची प्राथमिक फेरी मंगळवारी ठाण्याच्या ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेत पार पडली. लक्षवेधी अभिनय, नेत्रदीपक नेपथ्य आणि विषयांची आशयघन मांडणी या वैशिष्टय़ांसह रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून ११ महाविद्यालयांमधून चार महाविद्यालयांच्या एकांकिकांची निवड ठाणे विभागाच्या अंतिम फेरीसाठी झाली. आता ११ ऑक्टोबर रोजी ठाण्याची अंतिम फेरी गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. या अंतिम फेरीत ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालय, डोंबिवलीचे के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, नवी मुंबईचे डी. वाय. पाटील स्थापत्यशास्त्र महाविद्यालय आणि विरारचे विवा महाविद्यालय आपापल्या एकांकिका सादर करतील.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा आठ केंद्रांवर अस्तित्व या संस्थेच्या मदतीने सुरू आहे. या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५’ रेड एफएमचे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहकार्य लाभले आहे. आयरिस प्रॉडक्शन हे या कार्यक्रमाचे ‘टॅलेण्ट पार्टनर’, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत.
‘दिशा क्षणात धूसर, झाल्या बंदिवान वाटा.. बुडत्या सूर्याला विचारा, त्याचा थांग आता’, ‘समाजाच्या दृष्टीने तुम्ही वेडे आहात आणि वेडय़ांच्या झटापटीत एखादा वेडा’, ‘बंदुकीच्या नळकांडीतून शिकार दिसते, माणूस नाही’, ‘माणसाला आधी माणूस बनता आले पाहिजे’, ‘बंदुकीचा चाप ओढल्यावर सुटते ती गोळी प्रश्न नाही’; अशा संवादांची पखरण असलेल्या आणि प्रेक्षकांच्या काळजाला भिडत त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडणाऱ्या एकांकिका ठाण्याच्या ज्ञानसाधना विद्यानिकेतनच्या सभागृहात पार पडल्या. या वेळी स्पर्धक कलाकारांच्या प्रतिभेला पारखण्यासाठी आयरिस प्रॉडक्शनचे मिलिंद सफई आणि सचिन गद्रे उपस्थित होते.
रवींद्र लाखे यांचे मार्गदर्शन
ठाणे विभागाच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांचे परीक्षण करण्याची जबाबदारी रवींद्र लाखे आणि नीलकंठ कदम यांनी पार पाडली. आजच्या पिढीच्या आजूबाजूला नवे विषय घडत असतात. त्या विषयांच्या खोलात जाऊन एकांकिकांची निर्मिती व्हावी. तसेच सादरीकरण करतानाही त्या विषयांचा आवाका लक्षात घेऊनच मांडणी करायला हवी, असे मार्गदर्शन रवींद्र लाखे यांनी केले.
मराठी एकांकिका सादर करताना भाषेचा पोत सांभाळायलाच हवा. भाषेचा वापर करताना नीट काळजी घ्यायला हवी. शब्दांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकांकिका किंवा कोणताही नाटय़ प्रकार घाईघाईत करण्याचा नाही. त्यासाठी पुरेसा वेळ आणि मार्गदर्शन असायला हवे, असेही लाखे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

अंतिम फेरीमध्ये दाखल महाविद्यालये..
’ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे – मित्तर
’के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, डोंबिवली – भुतके
’ डी. वाय. पाटील वास्तुविशारद महाविद्यालय, नेरुळ – ट्रायल बाय मीडिया
’विवा महाविद्यालय, विरार – वी द पीपल

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-10-2015 at 01:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×