ठाणे : सिद्धेश्वर तलाव परिसरात सुगी बिल्डरमार्फत क्लस्टर योजनेतून पाच हजारांहून अधिक रहिवाशांना कायमस्वरूपी हक्काची घरे देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच रविवारी सायंकाळी लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासीयांनीही क्लस्टर पुनर्विकासाचा निर्धार केला. रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याआड काहींचा क्लस्टरमध्ये स्वारस्य असल्याचा आरोप परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. त्याला शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा ठाणे महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी रविवारी निर्धार मेळाव्यातून प्रत्युत्तर देत योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगितले. या योजनेची माहिती देत नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय घरे खाली केली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
लोकमान्यनगर-शास्त्रीनगरमधील क्लस्टरच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. विकासाला विरोध नसला तरी नागरिकांचे विस्थापन आणि विनाश मान्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याआड काहींचा क्लस्टरमध्ये स्वारस्य असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जगदाळे यांनी रविवारी लक्ष्मी पार्क रस्त्यावर निर्धार मेळावा घेतला. क्लस्टरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत त्यांनी पुनर्विकासाची प्रक्रिया स्पष्ट केली. क्लस्टर म्हणजे बुलडोझर चालवून घरे पाडणे नव्हे तर जुन्या आणि अरुंद वसाहतींचा नियोजनबद्ध पुनर्विकास करून नागरिकांना सुरक्षित आणि हक्काचे घर देणे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांची घरे खाली करण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेणे, योग्य करारनामा करणे आणि पर्यायी व्यवस्था निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्लस्टरची प्रक्रिया सर्वेक्षण, बायोमेट्रिक नोंदणी, पात्रता निश्चिती, विकास आराखडा आणि त्यानंतर महापालिका आणि शासनाच्या मंजुरीनंतरच पुढे जाईल, असे जगदाळे यांनी सांगितले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकही घर खाली केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रिंग मेट्रो आणि विकास आराखड्यातील रस्ते हा क्लस्टर योजनेच्या नियोजनचा एक भाग असून अद्याप कुणालाही घरे खाली करण्याच्या नोटीसा दिल्या नसतानाही नोटीसा दिल्याचे सांगून संभ्रम निर्माण केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
समतानगरसारखे लोकमान्यनगर होऊ देणार नाही
लोकमान्यनगरमधील नागरिकांना पाचशे मीटर च्या आत घरे देण्याची मागणी काहीजण करत आहेत पण, त्यांनी समतानगरमध्ये करारनामा न करता काही नागरिकांची घरे खाली करण्यात आली. लोकमान्यनगरच्या नागरिकांच्या बाबतीत तसे होऊ देणार नाही, असे सांगत जगदाळे यांनी यावेळी सरनाईकांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
लोकमान्यनगरचा नागरिक लोकमान्यनगरमध्येच
क्लस्टरच्या प्रक्रियेत नागरिकांचे विस्थापन हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे जगदाळे यांनी स्पष्ट केले. लोकमान्यनगरचा नागरिक शक्यतो लोकमान्यनगरमध्येच राहिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांना त्यांच्या परिसरापासून दूर पाठविण्याऐवजी पुनर्वसनाची योग्य व्यवस्था करूनच पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सुमारे १५० एकर परिसराचा एकत्रित विचार करून रस्ते, पाणी, ड्रेनेज, उद्याने, शाळा, क्रीडा सुविधा आणि इतर नागरी सुविधांचा समावेश असलेला विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. विकास टप्प्याटप्प्याने होणार असला तरी नियोजन एकत्रित होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंदेंच्या नेतृत्वाखाली क्लस्टरचा पाठपुरावा
नागरिकांच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्यनगर-शास्त्रीनगरमध्ये क्लस्टर राबविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जगदाळे यांनी स्पष्ट केले. क्लस्टरमुळे नागरिकांना केवळ नवीन घर नव्हे, तर त्यासोबत आवश्यक नागरी सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्यनगर-शास्त्रीनगरमधील ३१ संस्थांच्या माध्यमातून नागरिकांशी सातत्याने संवाद सुरू असल्याचे सांगत जगदाळे यांनी नागरिकांच्या सहभागातूनच पुढील प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट केले. प्रत्येक विभागातून नागरिकांचा सहभाग असलेली समिती तयार करून क्लस्टरबाबतची माहिती घराघरात पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लस्टर योजनेचा निर्धार
क्लस्टरला विरोध करणाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करावी, तर समर्थकांनीही नागरिकांच्या शंकांना उत्तरे द्यावीत, असे आवाहन जगदाळे यांनी केले. वादापेक्षा संवादातून मार्ग काढण्याची गरज असून नागरिकांच्या संमतीशिवाय कोणताही विकास पुढे नेला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेळाव्यात उपस्थित सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांसमोर लोकमान्यनगर-शास्त्रीनगरचा नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांच्या हक्काचे घर आणि नियोजनबद्ध विकास हवा’, अशी भूमिका या मेळाव्यातून पुढे आली.
शिवसेना विरुद्ध शिवसेना
लोकमान्यनगर बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जगदाळे यांना लक्ष्य केले होते. त्याला जगदाळे यांनी रविवारी निर्धार मेळाव्यातून प्रत्युत्तर दिले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगरसेवक दिलीप बारटक्के, मनोज शिंदे, राजा जाधवर, वनिता घोगरे, सरिता ठाकूर, सिद्धार्थ ओवळेकर, योगेश जानकर, भाजप नगरसेवक अमित सरेया, मनसे नेते अविनाश जाधव, उबाठाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी उपस्थितीत राहत जगदाळे यांना पाठींबा दिल्याने येथे सेनेचे मंत्री सरनाईक विरुद्ध सेनेचे नगरसेवक असे चित्र दिसून आले.
