ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथील रहिवाशांसाठी अत्यावश्यक असलेला रस्ता वनविभागाने अचानक बंद केल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रुग्णवाहिका, शाळा बससह सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाल्यामुळे परिसरातील सुमारे ४०० कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवण्याबरोबरच वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तोडगा काढल्याने हा रस्ता पुन्हा खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ मधील सुमारे ४०० हून अधिक कुटुंबांची वापरातील पायवाट आणि रस्ता वनविभागाने बंद केल्याने रहिवाशांची मोठी कुचंबणा झाली. या समस्येमुळे त्रस्त नागरिकांनी झाले असून त्यांच्यामधून संताप व्यक्त होत होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात नगरसेवक अमित सरैय्या यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

वनखात्याच्या जागेतून जाणारी ही पायवाट आणि रस्ता सुमारे ६० वर्षे नागरिकांच्या वापरात आहे. या मार्गावरून रुग्णवाहिका, शाळा बस, अग्निशमन दल, मलनिस्सारण विभागाची वाहने तसेच रहिवाशांची ये-जा सुरळीत सुरू होती. मात्र अचानक वनविभागाने गेट लावून हा रस्ता बंद केल्याने शेकडो रहिवाशांना पायी प्रवास करावा लागत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची वाहनेही परिसरात पोहोचू शकत नसल्याने गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर केळकर यांनी तातडीने वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवून रहिवाशांची व्यथा मांडली आणि काही अटींसह पायवाट पुन्हा खुली करण्याची विनंती केली. यासोबतच त्यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याने लवकरच मार्ग खुला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात आरटीआय, शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग तसेच आर्थिक फसवणूक यांसारख्या विविध विषयांवरही नागरिकांनी निवेदने सादर केली.