ठाणे : ठाण्यात भाजप-महायुतीकडून सुरु असलेल्या लोकतंत्र बचाव रॅलीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सडकून टीका करत एक व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे. त्यामध्ये राष्ट्रगीत सुरु असतानाच, पाणी वाटप सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, रॅलीतील गर्दीवरूनही त्यांनी भाजप आणि महायुतीवर टीका केली नेमका काय प्रकार आहे, वाचूया.

भाजपच्या वतीने पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालय ते तलावपाली येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या पदयात्रेत सहभागी होणार असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सकाळी साडेअकराच्या सुमारास संपल्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह महायुतीचे खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. तलावपाली येथील अहिल्यादेवी पुतळ्यासमोरील परिसरात रॅली पोहचल्यानंतर येथील मंचावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेते पोहचले. त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर या पदयात्रेची सांगता झाली. दरम्यान, अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केला. ‘ठाण्यातील लोकतंत्र बचाव रॅलीमध्ये राष्ट्रगीत सुरु असताना पाणी वाटप सुरु होते.. असा आरोप करणारा एक व्हिडीओ अविनाश जाधव यांनी प्रसारित केला. हाच का लोकशाहीचा आणि राष्ट्रगीताचा सन्मान? तुफान गर्दीचा दावा करणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात ाली असेलच, स्वत: कार्यकर्तेही अपेक्षित संख्येने उपस्थित नाहीत. बाकी लोकांचा सहभाग किती आहे, हे तर दिसतच आहे.. गर्दीचे दावे मोठे पण प्रत्यक्षात मैदानात चित्र वेगळेच, लोकशाही वाचवायला निघालेल्यांनी आधी राष्ट्रगीताचा सन्मान आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांचा सहभाग तरी तपासावा… असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.