ठाणे – महात्मा फुले मार्केटमागील महापालिकेच्या जागेवर तब्बल चार हजार चौरस फुटांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेने केलेल्या किरकोळ कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पत्रे काढून सांगाडा कायम ठेवण्याच्या कारवाईवर आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला असून, अतिक्रमणाला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह संबंधित सहायक आयुक्तांवरच कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळील महात्मा फुले मार्केटमागील महापालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले. या जागेवर रात्रीच्या अंधारात चार हजार चौरस फुटावर अनधिकृत पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. याबाबत स्थानिकांनी केलेल्या तक्रारींना प्रभाग समितीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात निवेदन दिल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा केला. नुकत्याच झालेल्या कारवाईत फक्त पत्रे काढण्यात आले असून सांगाडा मात्र कायम ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे भूमाफियांनी पुन्हा बांधकाम करण्यासाठी साहित्य आणले आहे. या किरकोळ कारवाईमुळे संबंधित अधिकारी अतिक्रमणाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केळकर यांनी केला. अतिक्रमण होऊ नये म्हणून उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत आयुक्तांना देखील पत्र दिल्याची माहिती केळकर यांनी दिली.
नोकरीच्या नावाने फसवणूक
या कार्यक्रमात नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार देखील दाखल झाली. स्टेशन परिसरात रिप्लेसमेंट सर्व्हिस देणारी अनेक दुकाने असून ते तरुणांची दिशाभूल करून लाखोंची फसवणूक करत आहेत. या दुकानांना सील ठोकण्याची मागणी करताना संबंधित एजन्सी चालकाला सोमवारी कार्यक्रमात बोलावून निवाडा करण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.
