ठाणे : ठाणे शहरातील महत्त्वाचा आणि वाहनांनी अत्यंत गजबजलेल्या माजिवडा चौकात ठाणे महापालिकेकडून सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुढील महिन्याभरात प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी होण्याची शक्यता आहे. माजिवडा चौकातील मानवी पद्धतीने वाहतुकीचे व्यवस्थापन करणे कठीण ठरते. त्यात सिग्नल यंत्रणा सुरु कार्यान्वित केल्यास कोंडी वाढेल की सुटेल हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे शहरातील वाहतुकीसाठी माजिवडा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, माजिवडा गाव, गोकुळनगर परिसर, कोलशेत, कापूरबावडी, बाळकूम, पोखरण रोड, वसंत विहार या भागातील हजारो वाहने या चौकातून वाहतुक करतात. या चौकात सहा रस्ते एकमेकांना जोडले जातात. अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव, वाहन चालकांची बेशिस्ती यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत वाहतुक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते. माजिवडा येथील वाहतुक कोंडीचा परिणाम शहरातील इतर भागातील वाहतुकीवर बसतो.

सध्या येथील वाहतुकीचे नियोजन ठाणे वाहतुक पोलिसांकडून केले जाते. वाहतुक साहाय्यक आणि वाहतुक शाखेचे कर्मचारी तैनात असतानाही येथील वाहतुक कोंडी सोडविणे कठीण ठरते. रात्री कोंडी झाल्यास कॅसलमिल-माजिवडा ते कापूरबावडी हे १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे वाहन चालकांना मानसिक ताणाला देखील सामोरे जावे लागते.

ठाणे महापालिकेने आता माजिवडा चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे. हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार असून त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर कापूरबावडी चौकात सिग्नल उभारले जाण्याची शक्यता आहे. माजिवडा चौक सर्वाधिक वर्दळीचा चौक आहे. या मार्गावर सिंग्नल यंंत्रणा सुरु झाल्यास सिग्नल लाल दिव्याचा असल्यास आणि वाहनांचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम इतर वाहतुक व्यवस्थेवरही बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होईल का पाहणे महत्त्वाचे ठरेल.

म्हणून सिग्नल यंत्रणा

वाहतुक पोलिसांच्या मागणीमुळे सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. माजिवडा चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ आणि वाहतुक साहाय्यकांचा सर्वाधिक वापर होतो. सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतर मनुष्यबळाचा वापर कमी होईल. तसेच बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई देखील करता येईल. सिग्नल यंत्रणा परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा देखील असेल. त्यामुळे वाहतुक नियमांचे पालन देखील होऊ शकेल असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.