ठाणे : माजिवडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू गृहसंकुलातील २१ व्या मजल्यावरून पडून ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. कुमुधा शेट्टी असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणाची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वसंत लॉन्समधील सवाना टॉवर ही २३ मजली इमारत आहे. या इमारतीच्या २१व्या मजल्यावरील सदनिकेत कुमुधा शेट्टी वास्तव्यास होत्या. बुधवारी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास त्या सदनिकेच्या सज्जामधून दुसऱ्या मजल्यावरील पोडियमवरील भागात पडल्या. उंचावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोडियमवर पडलेला मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्रसामग्रीच्या साह्याने खाली आणला. प्राथमिक तपासात, कुमुधा यांनी लिहिलेली कोणतीही चिठ्ठी पोलिसांना आढळून आली नाही. हे प्रकरण आत्महत्येचे आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, मृत महिलेचा मुलगा देशातील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर गृहसंकुलातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.