ठाण्यातील मॉल नाताळमय

ख्रिसमसच्या निमित्ताने ठाणे शहरातील मॉल प्रशासनाने वेगळे काय केले आहे याचा घेतलेला हा वेध..

हा आठवडा मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी अविस्मरणीय ठरावा असा प्रयत्न ठाण्यातील अनेक मॉल प्रशासनाने केली आहेत.

नाताळ आणि वर्षांचा शेवटचा आठवडा असल्याने हा आठवडा मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी अविस्मरणीय ठरावा असा प्रयत्न ठाण्यातील अनेक मॉल प्रशासनाने केली आहेत. त्यासाठी मॉलच्या सजावटीसाठी विशेष लक्ष देण्यात आले असून सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री या पारंपरिक सजावटीबरोबरीनेच मॉलमधील विविध भागामध्ये सेल्फी स्पॉटचीसुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मॉलमध्ये आल्यानंतर आकर्षक सेल्फी काढण्याची पुरेपूर व्यवस्था मॉल प्रशासनाने केली. या बरोबरीनेच शहरातील विविध भागांमध्ये मॉलचे कर्मचारी जाऊन या भागांमध्ये आपल्या मॉलमध्ये नवीन कोणकोणत्या गोष्टी आहेत याची माहिती ग्राहकांना करून देत आहेत. त्यामुळे ख्रिसमस निमित्ताने मॉल प्रशासन ग्राहकांच्या दारात अवतरले असल्याचे चित्रसद्धा निर्माण झाले आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने ठाणे शहरातील मॉल प्रशासनाने वेगळे काय केले आहे याचा घेतलेला हा वेध..

विवियाना मॉलचा भूलभुलैया

नाताळ हा बच्चेकंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण असून स्वप्नात येणारा सांताक्लॉज अनेक भेटवस्तू देताना दिसतो. बच्चे कंपनीला भेटवस्तू देणाऱ्या या सांताक्लॉजची भूमिका मॉल प्रशासन पूर्ण करताना दिसत आहे. कारण विवियाना मॉलमध्ये खास बच्चेकंपनीसाठी भूलभुलैया हा खेळ मॉलच्या दर्शनी भागामध्ये साकारण्यात आला आहे. १७ डिसेंबरपासून ३ जानेवारीदरम्यान मॉलने हा खेळ मुलांसाठी खुला केला असून याशिवाय अनेक ऑफर्सची लयलूटही केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये या खेळा, खरेदी करा आणि बक्षिसे मिळवा ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आठवडय़ाभराची युरोप सहल मॉलने ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. तसेच या कालावधीत विविध मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानीही विवियानामध्ये सुरू राहणार आहे. या शिवाय शोभायात्रा, नाताळगीते, विविध कार्यशाळा आणि उत्साही वातावरण मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे.

‘कोरम’मध्ये सांता लॅण्ड..

प्रत्येक सण वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा करणाऱ्या कोरम मॉल प्रशासनाने यंदाच्या नाताळच्या सेलिब्रेशनमध्येही उत्साह आणि जल्लोशाची पेरणी केली आहे. मॉल परिसरातली झाडांवर विद्युत रोषणाई करण्याबरोबरच मॉलच्या अंतर्गत भागातही ख्रिसमसचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेला भुरभुरणारा बर्फ, भला मोठा ख्रिसमस ट्री आणि भेटवस्तू वाटणारा सांता असे वातावरण कोरमध्ये निर्माण करण्यात आले आहे.

सांता आता ऑनलाइन.
लहानग्यांना एखादी गोष्ट सांगितली की ती, त्यांना खरी वाटू लागते. सांताची पारंपरिक गोष्टीचेही तसेच. सांता आपल्यासाठी भेटवस्तू घेऊन येणार हा बच्चेकंपनीचा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी ऑनलाइन बाजारात पर्याय उपलब्ध होऊ लागले आहे. एवढेच नाही तर सांताचे वेगवेगळे पॅकेजेस ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सांता ऑन कॉल या वेबसाइटवर तुमचा सांता बुक करा. दुसऱ्या दिवशी भेटवस्तू घेऊन सांता हजर. लहाग्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सेल्फी विथ सांता, डान्स विथ सांता, असे विविध पॅकेज ऑनलाइन उपलब्ध आहे. पाचशे रुपयांपासून ते दोन हजार एवढी या सांताक्लॉजची किंमत आहे.

नाताळचा बाजार सजला..
नाताळ सणाच्या काही दिवस आधीच नाताळच्या खरेदीची लगबग ठाण्याच्या बाजारात पाहायला मिळाली. नाताळ सणाच्या निमित्ताने घरात सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी बाजारात पाहायला मिळाली. चांदण्या तसेच सांताक्लॉजच्या आकाराचे कंदील, एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठी येशुख्रिस्ताचे पुतळे, ख्रिसमस ट्री, नाताळ सणाच्या दिवशी परिधान करणाऱ्या रंगीबेरंगी टोप्या अशा विविध वस्तू नाताळच्या बाजारात उपलब्ध होत्या. लहान मुलांच्या आकर्षण असलेल्या सांताक्लॉजचे मुखवटे, सांताक्लॉजचे कपडे खरेदीसाठी लहान मुलांची एकच गर्दी बाजारात होती. मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा देणारे स्टिकर्स, रंगीबेरंगी फुग्यांनी ठाण्यातील बाजारपेठ सजली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane mall gears up for christmas

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या