ठाणे : येथील लुईसवाडी भागातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरील पुर्व द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सकाळी एका माथेफिरूने धिंगाणा घातला. हाता मोठी काठी घेऊन तो रस्त्यावर धावत होता आणि येणाऱ्या वाहनांच्या दिशेने काठी फिरवत होता. यात तीन वाहनांच्या काचा फुटून त्यांचे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले असून त्याचबरोबर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे शहरातील वाहतूकीसाठी पुर्व द्रुतगती महामार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून मुंबई, नवी मुंबई तसेच घोडबंदर, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गालगत असलेल्या लुईस वाडी भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभदिप निवासस्थान आहे. त्यांच्या समोरील कालिका मंदिराजवळील महामार्गावर मंगळवारी सकाळी १० वाजता एक व्यक्ती हातात मोठी काठी घेऊन आला आणि रस्त्यावर सैरावैरा धावू लागला. हा प्रकार पाहून नागरिकही भेदरले. काहींनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वाहनांच्या दिशेने काठी फिरविण्यास सुरूवात केली. यात दोन कार आणि एक रिक्षाचा समावेश आहे. हातात काठी असल्याने त्याला पकडणेही शक्य होत नव्हते. याबाबत नौपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

वाहनचालक नफिज कामृद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुनील राजदर वानखेडे असे आरोपीचे नाव असून तो मुळचा जळगाव जिल्ह्यातील मुडी गावचा रहिवाशी आहे. तो इथे कशासाठी आला होता. हे समजू शकलेले नाही. त्याने चार चाकी गाडीवर लाकडी काठी मारून गाडीची पुढील आणि मागील काच फोडली तसेच त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या रिक्षा आणि एका कारची पुढील काच फोडलेली आहे.

त्याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (४) प्रमाणे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. तक्रारदारासह इतर वाहनचालकांनी सुनील राजधर वानखेडे याला मारहाण केल्याने त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करून नंतर पोलीस ठाण्यात आणले होते. चौकशीत त्याला मानसिक आणि आकडीचा त्रास असून त्याच्यावर उपचार घेत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अभय महाजन यांनी दिली.