ठाणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरकडील त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना ठाण्यात एका तरुणाने त्याच्या पत्नी आणि नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीसोबत होणारे वाद तसेच विवाह समारंभात झालेला ५ लाख रुपयांचा खर्च परत करा अशी मागणी त्याची पत्नी आणि नातेवाईक करत होते. त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वागळे इस्टेट येथील इंदिरानगर परिसरात तरुण वास्तव्यास असून त्याचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. परंतु पत्नी आणि त्याच्यामध्ये खटके उडत होते. अवघ्या तीन महिन्यांत त्याची पत्नी घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर त्याची पत्नी आणि तिच्या माहेरीकडील नातेवाईक तरुणाकडून विवाह समारंभामध्ये झालेला ५ लाख रुपयांचा खर्च मागू लागले. परंतु काही महिन्यांनी त्याची पत्नी पुन्हा राहण्यास आली. त्यानंतरही त्यांच्यामध्ये वाद होत होते. सुमारे आठवडाभरापूर्वी त्याने घरामध्ये गळफास घेतला होता. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच्या भावाने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पत्नीसोबत होणारे वाद आणि ५ लाख रुपयांची मागणी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्याच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार, श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.