ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येनंतर मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर भागात संतापाची लाट उसळल्याचे चित्र बुधवारी दिवसभर दिसून आले. मानपाड्यात बंद पुकारण्याबरोबरच नातेवाईकांसह समर्थकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. दुपारी पूर्णेकर यांचे पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका पोलिस ठाण्यात आणण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलिसांसह चर्चा केली व त्यानंतर पूर्णेकर यांचे पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका थेट पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यात आली.
आरोपींची अटक करून न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांसह समर्थकांनी ठिय्या मांडला. गर्दी लक्षात घेता पोलिसांनी पोलिस ठाणे व मानपाडा भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केल्याने तणावाचे वातावरण होते.
मानपाडा येथील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हे मंगळवारी रात्री त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या व त्यानंतर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हत्येची बातमी कळताच, त्यांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी रुग्णालय परिसरात धाव घेतली. घोडबंदर मार्गालगत हे रुग्णालय असल्याने महामार्गावर मोठी गर्दी जमली. रात्री उशिरापर्यंत जमाव कायम राहिल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. बुधवारी पहाटे त्यांचा मृतदेह मुंबईतील जे जे रुग्णालयात नेण्यात आला.
बुधवारी मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदविला. परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिसरात ठिकठिकाणी पूर्णेकर यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. तसेच परिसरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि समर्थकांनी दुपारी कापूरबावडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यात पुर्णेकर यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी दुपारी पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलीस ठाण्याजवळ आणल्यानंतर समर्थकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी रुग्णवाहिका पोलिस ठाण्याच्या आवारात सोडण्यास मनाई केली. यामुळे समर्थक आक्रमक झाले. गर्दीमुळे कापूरबावडी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे. मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर परिसर व पोलीस ठाण्याच्या परिसरात सुमारे ४०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. हत्येतील अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेनंतरही मानपाड्यातील तणाव कायम आहे.
