ठाणे : ठाणे रेल्वे स्थानककात एका मराठी तरुणाला मोबाईल रिचार्जवरून झालेल्या वादातून मोबाईल दुकानातील तीन ते चार परप्रांतीयांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना कार्यालयात बोलावून जाब विचारत माफी मागायला लावली. तसेच मारहाण झालेल्या मराठी तरुणानेही त्या कामगारांच्या कानशिलात यावेळी लगावली आणि यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी मागितली.

ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण राहतो. तो दररोज कामानिमित्ताने ठाणे स्थानक येथून प्रवास करतो. सोमवारी रात्री ८ वाजता ठाणे स्थानकातून लोकमान्यनगरला आपल्या घरी जात होता. त्यावेळी मोबाईलमधील रिचार्ज संपला. यामुळे तो ठाणे स्थानकाजवळील मोबाईल दुकानात गेला. दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागले आणि काही वेळाने रिचार्ज नाही असे उत्तर दुकानदाराने त्याला दिले.

त्यावरून त्याचा दुकांदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील तीन ते चार परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले आणि यानंतर त्याच्या सोबत नौपाडा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला. तिथे मारहाण झालेल्या मराठी तरुणही उपस्थित होता. त्याने मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कानशिलात लगावली. यानंतर कामगारांनी तरुणांच्या पाया पडत माफी मागितली. तसेच कांन पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचे सांगितले.