ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या आयोजनातील ढिसाळ नियोजन व गैरव्यवस्थापनाची महापालिकेबाहेरील त्रयस्थ समितीमार्फत थेट चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. शिवाय, स्पर्धकांकडून आकारण्यात आलेले शुल्क बेकायदा असल्याचा आरोप करत ते तातडीने परत करण्याची मागणीही केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे ही स्पर्धा नव्या वादात सापडली आहे.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. ती उशिरा सुरू होणे, पदक वाटपातील गोंधळ, ई-प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी व अल्पोपहारची उशिरा झालेली व्यवस्था यामुळे स्पर्धकांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. खेळाडू व नागरिकांकडून आकारण्यात आलेले शुल्क कोणत्या निर्णयाच्या वा मंजुरीच्या आधारे जमा करण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी यापूर्वी स्पर्धकांकडून शुल्क आकारले जात नव्हते. महासभा वा संबंधित बैठकीत शुल्क आकारणीला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे शुल्क बेकायदा ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मॅरेथॉन स्पर्धा नियोजनासाठी नेमण्यात आलेली संस्था, तिचे काम, झालेला खर्च, शुल्क आकारणीचा निर्णय व संबंधित अधिकारी यांची भूमिका यांची चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मॅरेथॉनच्या नावाखाली स्पर्धकांकडून शुल्क घेऊन त्यांना मूलभूत सुविधा देण्यात अपयश आले असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे केवळ खुलासा न करता चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.
स्पर्धा राजकीय श्रेयासाठी
ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर स्व. सतीश प्रधान यांनी शहरातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे व नामवंत तसेच नवोदित धावपटूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मॅरेथाॅन स्पर्धा सुरू केली. गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून नामवंत धावपटू या स्पर्धेत सहभागी होत होते. परंतु यंदाच्या वर्षी तसेच कुठेही दिसून आले नाही. यापूर्वी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीमुळे आणि दर्जेदार आयोजनामुळे या स्पर्धेला वेगळी ओळख मिळाली होती. मात्र, सध्या या मॅरेथाॅनचा मूळ क्रीडा उद्देश बाजूला पडून ती केवळ राजकीय श्रेय व समाजमाध्यमावरील प्रसिद्धीसाठी आयोजित केली जात असल्याची भावना निर्माण होणे चिंताजनक आहे. केवळ रिल्स व प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा स्पर्धेचा दर्जा व खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही मुल्ला यांनी म्हटले आहे.
