ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने महिलेने तिच्या पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राधा मिश्रा (२५) आणि तिचा प्रियकर अनुभव पांडे (२३) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनुभव याला अटक केली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी राधा आणि अनुभव या दोघांनी मृतदेह ठाणे खाडीत फेकला होता. परंतु त्या मृतदेहाचा शोध अद्याप लागू शकला नाही.

काल्हेर येथील दुर्गेश पार्क परिसरात बलराम मिश्रा (२७) हे त्यांच्या पत्नी राधा हिच्यासोबत वास्तव्यास होते. तर बलराम यांचा मित्र अनुभव हा देखील त्यांच्या सदनिकेसमोरील घरामध्ये वास्तव्यास होता. ७ ऑगस्टला मध्यरात्री अचानक बलराम यांच्या मोबाईलमधून एक संदेश त्यांच्या भावाच्या व्हाॅट्सॲपवर गेला. त्यामध्ये आम्ही तीन ते चार दिवसांसाठी पुण्याला नातेवाईकांकडे जात असल्याचे म्हटले होते. परंतु पुण्याला त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने बलराम यांच्या भावाला संशय आला. ते बलराम यांच्या घरी गेले. त्यावेळी घराला कुलुप होते. त्यांनी बलराम आणि राधा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे बलराम यांच्या भावाने याप्रकरणी बलराम आणि राधा हे बेपत्ता असल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केली.

हेही वाचा – Badlapur School Case : अत्याचारानंतर वैद्यकीय तपासणीसाठीही चिमुकलीची फरफट

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नारपोली पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही तपासले असता, अनुभव हा ७ ऑगस्टला मध्यरात्री इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलत असताना आढळून आला. त्यानंतर राधा देखील मोठ्या बॅग भरून बाहेर पडताना दिसली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे तपशील तपासले. त्यावेळी त्यांनी एक कार चालकाला संपर्क साधल्याचे समोर आले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्यांना एलटीटी रेल्वे स्थानकात सोडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एलटीटी स्थानकात जाऊन चौकशी केली. तेव्हा ते गोरखपुर एक्स्प्रेस या रेल्वेगाडीने गेल्याचे समोर आले. पोलिसांचे पथक गोरखपुर येथे गेले. तिथे पोलिसांनी अनुभव याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

हेही वाचा – ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

६ ऑगस्टला रात्री राधा आणि अनुभव यांनी बलराम यांची चाकूने वार करून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका बॅगेत भरला. दोघांनीही रात्री ऑनलाईन कार नोंदणी केली. त्याला कशेळी खाडीपर्यंत सोडण्यास सांगितले. कार कशेळी खाडीपर्यंत आल्यानंतर त्यांनी कार चालकाला पैसे दिले. कार चालक काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी मृतदेह खाडीत फेकून दिला. त्यांनी पुन्हा ऑनलाईन कार नोंदणी करत त्या कारने एलटीटी स्थानक गाठल्याचे तपासात समोर आले आहे. बलराम यांच्या मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत.