ठाणे : चित्रपट चित्रीकरणामुळे ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात शुक्रवारी वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे राम मारुती रोड, गडकरी चौक, डाॅ. मुस मार्ग, गोखले रोड प्रवास करणाऱ्या चालकांचे हाल झाले. उन्हाचा मारा आणि वाहतुक कोंडी अशा दुहेरी त्रासात वाहन चालक अडकले होते.

मासुंदा तलावाजवळ एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. त्यामुळे गडकरी रंगायत समोरील रस्त्यावर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आणलेले अनेक व्हॅनिटी व्हॅन, कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यालगत उभी करण्यात आली होती. येथील रस्ते अरुंद आहेत. त्यातच रस्त्यालगत मोठी वाहने उभी राहिल्याने मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.

या वाहतुक कोंडीमुळे चिंतामणी चौकातून राम मारुती रोड, दगडी शाळा, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, गोखले रोड भागात वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. ठाण्यात तापमान वाढत असल्याने दुचाकी चालकांना उन्हाचे चटके सहन करत प्रवास करावा लागत आहे. वाहतुक कोंडी झाल्याने उष्णता आणि वाहतुक कोंडी अशा दुहेरी समस्येत वाहन चालक अडकून होते.