ठाण्यात शिवसेनेत महापौरपदावरून रस्सीखेच सुरू झाली असून या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या पालकमंत्री एकनाथ िशदे यांना वाकुल्या दाखवीत थेट घराणेशाहीचा झेंडा महापालिकेवर रोवण्याच्या हालचालींना जोर चढल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ठाण्याचे महापौर पद यंदा महिलांसाठी राखीव असून खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक या तिघाही नेत्यांच्या पत्नी या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू झाली असून या हालचालींची चाहूल लागल्याने अस्वस्थ नगरसेवकांनी सोमवारी िशदे यांची भेट घेऊन नाराजीचा सूर आळवल्याची चर्चा आहे. एकीकडे शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे सत्ता आली, असे म्हणायचे आणि दुसरीकडे महापौरपदासाठी घराणेशाहीला प्राधान्य द्यायचे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया काहींनी मातोश्रींच्या दूतांकडेही व्यक्त केल्याचे सूत्रांकडून कळते.

ठाणे महापालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणुकांना सामोरे जाताना नेत्यांनी नातेवाईकांसाठी उमेदवारीचा हट्ट धरल्याने एकनाथ िशदे यांच्या नाकीनऊ आले होते. माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांची मनधरणी करताना तर शिवसेना नेत्यांना घाम फुटल्याचे बोलले जात आहे.घराणेशाहीने खासदार राजन विचारे यांचा पुतण्या तसेच आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाच्या पराभवामुळे हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. हरिश्चंद्र पाटील आणि त्यांच्या सुनेलाही घराणेशाहीचा फटका बसला. या पाश्र्वभूमीवर महापौर निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकाला उमेदवारी दिल्यास पक्षात प्रतिक्रिया उमटण्याची भीती  नगरसेवकांच्या एका  गटाने िशदे यांच्याकडे व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.\