ठाणे – ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून अर्ज दाखल करण्यात आलेले नसल्यामुळे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महापौर पदाच्या उमदेवार शर्मिला पिंपळोलकर, भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. असे असले तरी, या निवडीची अधिकृत घोषणा मंगळवारी ३ जानेवारी रोजी होण्याआधीच महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्याचे चित्र दिसून आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत १३१ पैकी ७५ नगरसेवक शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे निवडून आले तर, एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेना (शिंदे गट) पक्षाला पाठींबा जाहीर केला होता. भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढविली होती. यामुळे पालिकेमधील युतीतील नगरसेवकांचे संख्याबळ १०४ इतके झाले आहे. यामुळे युतीचा महापौर आणि उपमहापौर होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. परंतु महापौर कोणत्या पक्षाचा होणार, याविषयी वेगवेगळ्या चर्चा होत्या. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) पक्षाने महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांना तर, भाजपचे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांना उमेदवारी दिली.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ३ फेब्रुवारीला निवडणूक जाहीर झाली. तर, या पदाच्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत ३० जानेवारी होती. या दिवशी शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांनी तर, भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली असली तरी, त्याची औपचारिक घोषणा मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही घोषणा होण्याआधीच महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्याचे चित्र दिसून आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महापौर पदाच्या उमदेवार शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सोमवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी कोपरी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अष्टविनायक चौकातून या मोहिमेस प्रारंभ झाला, त्यानंतर कोपरी गाव, कन्हैया नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच बारा बंगला या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कचरा संकलन आणि साफसफाईबरोबरच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यासाठी (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेत नागरिक सहभागी झाले होते. पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, नानीक इंग्लिश स्कूल, श्री मा बालनिकेतन, विद्यासागर एज्युकेशन सोसायटी, जीवन ज्योती इंग्लिश मीडियम, इत्यादी शाळेचे शिक्षक आणि प्रत्येक शाळेचे ५० विद्यार्थी स्वच्छता अभियानमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सहभागी होते.
तसेच उद्यान विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम शिक्षण,अतिक्रमण, मलनिसारण विभाग आणि इतर विभाग सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत तसेच ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली. स्वच्छ सुंदर ठाणे ..हाच करुया निर्धार रे” च्या घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. या मोहिमेसाठी जेटिंग गाडी, पाण्याचे टँकर, सीएनडीच्या २ गाड्या, जेसीबी डम्पर तसेच कचरा उचलण्यासाठी ३ आरसी कॉम्पॅक्ट १० घंटा गाड्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेसाठी जवळपास ७०० सफाई कर्मचारी उपस्थित होते.
महापौर निवडणुक तयारी ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ३ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. नव्या महापौर आणि उपमहापौराच्या स्वागताची तयारी पालिकेत सुरू आहे. महापौर आणि उप महापौर कार्यालयातील साफसफाई करण्यात येत आहे. पालिकेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणुक होणार आहे. या सभागृहाच्या बाहेरील परिसरासह महापौर, उपमहापौर कार्यालयांना फुलांच्या माळा लावून सजविण्यात येत आहे. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ व्यासपीठ उभारण्यात येत आहे.

