ठाणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाला असून यामुळे ठाणे महापालिका महापौर पदाची निवडणुक पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, याबाबत राज्य शासनाकडून कोणतेही निर्देश आलेले नसल्यामुळे हि निवडणुक पालिका प्रशासनाने ठरलेल्या वेळेत म्हणजेच, ३ फेब्रुवारी रोजी करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आज, शुक्रवार उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुक निकालानंतर महापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली असून यानुसार, ३० जानेवारीला उमेदवारी अर्ज भरणे तर, ३ फेब्रुवारीला निवडणुक होणार आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना घडली. यामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
३० जानेवारीपर्यंत हा दुखवटा असून त्याचदिवशी महापौर पदाकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. यामुळे महापौर निवडणुक पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. निवडणुक पुढे ढकलण्याबाबत शासनाकडून निर्देश येण्याची शक्यता होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधीपर्यंत म्हणजेच, २९ जानेवारीपर्यंत राज्य शासनाकडून कोणतेही निर्देश आलेले नव्हते. यामुळे या निवडणुका आता वेळेतच होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

