Thane Municipal Corporation Mayor 2026: ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६ वर गेले आहे. ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते.नेमके तसच झाले.
ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट भाजपने धरला होता. मात्र, दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि यामुळे महापौर आणि उपहापौर पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी भाजपने महापौर पदाचा हट्ट सोडत शिवसेना (शिंदे गट) पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी केवळ अधिकृत निवडीची औपचारीकता शिल्लक राहिली होती.
ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. महापौर आणि उपहापौरांच्या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.

