ठाणे : ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदावर तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदावर बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापौर पिंपळोलकर आणि पाटील यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेने विकास झाला पाहिजे, यासाठीही कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
ठाणे महापालिका निवडणुकीत आम्ही ठाणेकरांना आश्वासन दिले होते. निवडणुकीपूर्वी भाजपने ठाणेकरांसाठी जाहीरनामा सादर केला होता. हा जाहीरनामा पूर्ण करण्याचा आता आमचा प्रयत्न असणार आहे. अनाधिकृत बांधकामांचा विषय हा सुरुच राहणार आहे. फेरीवाला धोरण का झाले नाही, फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. पदपथ आणि रस्ते व्यापलेले आहेत. ते मुक्त करण्यासाठी किंबहुना त्यावर सडतोड जाब विचारला जाणार आहे, असे केळकर म्हणाले.
वरिष्ठ नेते निर्णय घेतील
महापौर पद दिले नाहीतर स्वबळावर लढू असा इशारा भाजपने दिला होता. परंतु भाजपने सत्तेत सहभागी होत उपमहापौर पद स्विकारले तसेच इतर कोणती पदे भाजपला मिळणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी केळकर यांना विचारला असता, सत्तेत सहभागी होत आम्ही उपमहापौर पद घेतले आहे. परंतु इतर समिती बाबतचा निर्णय हा वरीष्ठ पातळीवर होणार असल्याचे केळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या काही दिवसात यावर सविस्तर चर्चा केली जाईल. जे काही वाटप होईल ते सन्मानपूर्वक झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
सडेतोड जाब विचारणार
पाच वर्षे भ्रष्टाचारमुक्त विकास राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु कोणी त्यात चुकत असेल तर त्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अनाधिकृत बांधकामांचा विषय हा सुरुच राहणार आहे. फेरीवाला धोरण का झाले नाही, फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे, फुटपाथ, रस्ते व्यापलेले आहेत. ते मुक्त करण्यासाठी किंबहुना त्यावर सडतोड जाब विचारला जाणार आहे. पाच वर्षे भ्रष्टाचारमुक्त विकास राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल. सत्तेत असलो तरी, कुठे चुकत असेल तर त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

