ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट धरणाऱ्या भाजपने अखेर माघार घेत शिंदेंच्या सेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे सेनेचा महापौर तर भाजपचा उपहापौर होणार असून शिंदे सेनेतर्फे
महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नगरसेवक संख्याबळ लक्षात घेता या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या दिवशी महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेतर्फे शर्मिला पिंपळोलकर या अर्ज दाखल करणार असून, भाजपातर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील या अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपने हट्ट सोडला
ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद भाजपला देण्याचा प्रस्ताव भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेपुढे मांडला होता. महापौर पद मिळाले नाहीतर विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असे इशारे भाजपने दिले होते. मात्र, शिंदे सेना महापौर पद सोडण्यास नकार दिला. त्याऐवजी पाच वर्षांच्या कालावधीत पहिले व शेवटचे सव्वा वर्ष उपमहापौर पद, तीन प्रभाग समित्या आणि दोन विशेष समित्या भाजपला देण्याची तयारी शिंदे सेनेने दर्शविली. भाजपनेही यासोबत स्थायी समिती आणि परिवहन समितीचे सभापती पद प्रत्येकी एक वर्ष देण्याची मागणी केली. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजपने महापौर पदाचा हट्ट सोडत शिंदेंच्या सेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
संख्याबळानुसार विजय निश्चित
शिवसेना (शिंदे गट) ७५, भाजप २८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १ आणि अपक्ष १ असे एकूण १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६ वर गेले आहे. त्यामुळे नगरसेवक संख्याबळ लक्षात घेता शिंदे सेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
ठाणे महापालिका महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे शिंदे सेनेतील आठ नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. शिंदेच्या शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील तब्बल सात नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) महिला – पद्मा भगत, ६ (अ) महिला – वनिता घोगरे, ७ (अ) महिला – विमल भोईर, ९ (अ) – गणेश कांबळे, १६ (अ) – डॉ. दर्शना जानकर, २४ (अ) महिला – आरती गायकवाड आणि २८ (अ)
दीपक जाधव यांचा समावेश होता. याशिवाय, कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शर्मिला पिंपोळकर यांचेही नाव चर्चेत होते. यामध्ये शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर पक्षाने अखेर शिक्कामोर्तब केला.

