ठाणे – नुकतीच ठाणे महापालिका महापौर पदी शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ठाणे महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाणे महापालिका महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे शिंदे सेनेतील आठ नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. शिंदेच्या शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील तब्बल सात नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये प्रभाग ३ (अ) मधील पद्मा भगत, ६ (अ) मधील वनिता घोगरे, ७ (अ) मधील विमल भोईर, ९ (अ) मधील गणेश कांबळे, १६ (अ) मधील डॉ. दर्शना जानकर, २४ (अ)मधील आरती गायकवाड आणि २८ (अ)मधील दीपक जाधव यांचा समावेश होता. या सात जणांसह कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शर्मिला पिंपोळकर यांचेही नाव चर्चेत होते. यापैकी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर पक्षाने अखेर शिक्कामोर्तब केला.

३ फेब्रुवारी ला जरी महापौर पदासाठी निवडणूक होणार असली तरी शर्मिला पिंपोळकर यांच्या विरोधात अर्ज दाखल झालेले नसून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ३ तारखेला फक्त अधिकृत निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.

परंतु, ३ तारखे आधीच शर्मिला पिंपोळकर यांनी कामाला सुरुवात केल्याची दिसत आहे. रविवारी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेत सर्वंकष स्वच्छता मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, नगरसेवक भरत चव्हाण हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज, सोमवार रोजी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अशी पार पडली स्वछता मोहीम…

कोपरीतील अष्टविनायक चौक येथून या सर्वंकष या स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. कोपरी गाव, कन्हैया नगर सिद्धार्थ नगर, बारा बंगला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्ते व परिसराची साफसफाई, कचरा संकलन, रस्ते पाण्याने धुणे त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांची साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्यात आले. याशिवाय या मोहिमेदरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण देखील केले. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.