Thane Mayor Sharmila Pimpolkar: ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्विकारला. परंतु निवड झाल्यानंतर कार्यालयात पदभार स्विकारण्याऐवजी महापौर पिंपळोलकर या थेट मिरवणुकीत सहभागी झाल्या. त्या महापौर कार्यालयातील पदभार न स्विकारताच तेथून निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. नुकतीच महापालिकेची निवडणुक पार पडली. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६ वर गेले आहे. दरम्यान, युतीत निवडणुक लढविली असल्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
प्रशासकीय राजवट संपुष्टात
ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.
पदभार न स्विकारताच निघून गेल्या
ठाणे महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्विकारला. परंतु महापौर पिंपळोलकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नाही. त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या. त्या महापौर कार्यालयातील खुर्चीच न बसताच तेथून निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
पदभार न स्विकारण्याचे कारण काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत. यामुळे ते महापौर पदभार स्विकरण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. या कारणामुळे पिंपळोलकर यांनी पदभार स्विकारला नसून सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्विकारण्याचे पिंपळोलकर यांनी ठरविले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. दरम्यान, महापौर पिंपळोलकर यांना पदभार न स्विकारण्यामागचे कारण पत्रकारांनी विचारले असता, पदभार अजून स्विकारला नसला तरी आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत, असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.

