ठाणे : ठाणे महापालिका महापौर पदावर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची तर, उपमहापौर पदावर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीनंतर लेझीम-ढोल पथक, ब्रासबँडचे वादन अन् फटाक्यांची आतषबाजी करत महापौर पिंपळोलकर आणि उपमहापौर पाटील यांची एकत्रित मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये नगरसेवक, नगरसेविका भगवे फेटे घालून सहभागी झाले होते. तसेच पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या व्यासपीठावर ठेवण्यात आलेला शिवाजी महाराजांचा सिहासनावरील पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर मंगळवारी

झालेल्या ठाणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. या सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली.

नव्या महापौर आणि उपमहापौराच्या स्वागतासाठी पालिकेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह फुलांनी सजविण्यात आले होते. पालिका मुख्यालय प्रवेशद्वार, महापौर, उपमहापौर कार्यालयांना फुलांच्या माळा लावून सजविण्यात आले होते. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ व्यासपीठ उभारण्यात आले होते. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सिहासनावरील पुतळा ठेवण्यात आला होता. या व्यासपीठासमोरच महिला लेझीम पथकाने सादरीकरण केले. त्याचबरोबर ब्रासबॅँड आणि ढोल पथकाचे वादन आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनेक महिला कार्यकर्त्या फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. महापौर पिंपळोलकर आणि उपमहापौर पाटील यांची एकत्रित मिरवणुक काढण्यात आली होती. महापौर आणि उप महापौर निवडणुकीवेळी शिंदे सेना आणि भाजपचे नगरसेविक, नगरसेविकांनी भगवे फेटे परिधान केले होते.

प्रशासकीय राजवट संपुष्टात

ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे.