ठाणे : अत्यंत गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनातील त्रुटी यंदाही समोर आल्या. स्पर्धकांची घटती संख्या, प्रमाणपत्रे आणि पदकांच्या वाटपातील गलथान कारभार, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी स्पर्धा उशिरा सुरू होणे, तसेच पाणी आणि अल्पोपहाराच्या उपलब्धतेतील दिरंगाईमुळे अनेक स्पर्धकांनी नाराजी व्यक्त केली. काही स्पर्धकांनी पुढील वर्षीपासून या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे दिवंगत खासदार सतीश प्रधान यांनी ही स्पर्धा सुरू केली होती. यंदा मॅरेथॉनचे ३२ वे वर्ष होते. रविवारी पहाटेपासूनच धावपटू आणि स्पर्धक महापालिका मुख्यालयाजवळील चौकात जमण्यास सुरुवात झाली होती. यंदाच्या स्पर्धेत ३० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात सहभागी स्पर्धकांची संख्या कमी दिसत होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. सकाळी ६ वाजता २१ किलोमीटर गटातील स्पर्धा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती उशिराने झाल्याने ही स्पर्धा सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू झाली. त्याचा परिणाम इतर गटांतील स्पर्धकांनाही सहन करावा लागला. स्पर्धकांकडून या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, २१ किलोमीटरच्या मार्गिकेवर मार्गदर्शन करणारे फलकही अपुरे असल्याची तक्रार स्पर्धकांनी केली.

२१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर आलेल्या अनेक स्पर्धकांना पदके उपलब्ध होऊ शकली नाहीत. त्याचबरोबर तीन किलोमीटरच्या स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. ज्या ठिकाणी २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण होत होती, त्याच ठिकाणी तीन किलोमीटर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचीही सीमा रेषा निश्चित करण्यात आली होती.

सुरुवातीला केवळ २१ किलोमीटरच्या स्पर्धकांसाठी पदकांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तीन किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शालेय विद्यार्थ्यांनाही पदके देण्यात आली. त्यामुळे पदक वाटपात गोंधळ झाला. पदके न मिळाल्याने काही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मुख्य व्यासपीठासमोरच घोषणाबाजी केली. अखेर महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्यासह नगरसेवकांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयातही घोषणाबाजी केली.

क्रीडा विभागाच्या उपायुक्त मीनल पालांडे यांनी स्पर्धा पूर्ण केलेल्या धावपटूंना महापालिकेच्या स्व. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पदकांचे वाटप केले. तसेच, विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रशस्तिपत्र दिले जाते. विद्यार्थ्यांना पदक देण्याची तरतूद यापूर्वीही नव्हती. त्यामुळे गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या लहान मुलांनी आपले कौशल्य दाखवत स्पर्धा पूर्ण केली. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना त्यांचे हक्काचे पदकही मिळाले नाही. स्वतःच्या हक्कासाठी या लहान मुलांना भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करावे लागणे ही ठाण्याच्या संस्कृतीला आणि क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणारी बाब आहे. केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

मॅरेथॉन स्पर्धा ‘झेन अल्फा’ने गाजवली. या स्पर्धेचे शहरात फलक खूप होते; मात्र पदक नव्हते, अशी टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली.

– २१ किलोमीटरच्या स्पर्धकांना पदके देण्यास विलंब झाला, हे सत्य आहे. मात्र, त्यानंतर स्व. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पदकांचे वाटप पूर्ण करण्यात आले. तसेच, स्पर्धकांची आम्ही दिलगिरी व्यक्त केली. मॅरेथॉनच्या मार्गिकेवर पाण्याच्या बाटल्या, इतर सुविधा आणि आमचे कर्मचारी उपस्थित होते. – मीनल पालांडे, उपायुक्त, क्रीडा विभाग, ठाणे महापालिका.

-२१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर सुमारे तीन तासांनी पदक मिळाले. स्पर्धाही सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू करण्यात आली. त्यामुळे स्पर्धक आणि खेळाडूंमध्ये संताप होता. ठाणे वर्षा मॅरेथाॅन स्पर्धेचे नियोजन ढिसाळ असते असे अनेक धावपटूंनी मला यापूर्वी सांगितले होते. मात्र, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. पुढील वर्षीपासून या स्पर्धेत सहभागी होणार नाही, असे एका स्पर्धकाने सांगितले.