ठाणे : रविवारी होणाऱ्या ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी तब्बल ३० हजारांहून अधिक स्पर्धक ठाण्याच्या रस्त्यांवर धावणार आहेत. त्यामुळे मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे, अतिक्रमणे, रस्त्यांची स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. स्पर्धेपूर्वीच ही आव्हाने दूर करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून, खड्डे बुजवा, अतिक्रमणे हटवा व मार्ग सुरक्षित करा, अशा स्पष्ट सूचना आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉनच्या अंतिम पूर्वतयारीची बैठक महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. या बैठकीत महापौर व आयुक्तांनी मॅरेथॉनच्या संपूर्ण नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस खासदार नरेश म्हस्के, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक राम रेपाळे, अतिरिक्त आयुक्त मनिष जोशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, वाहतूक विभाग तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खड्डे बुजवा, अतिक्रमणे हटवा
– पावसाळी वातावरण, रस्त्यांची सद्यस्थिती व मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मॅरेथॉनचे नियोजन करण्यात आले आहे. पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, मार्गावरोधक, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, फिरते शौचालय व स्वयंसेवकांची नियुक्ती याबाबत आयुक्तांनी सर्व विभागांकडून आढावा घेतला.
– गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, तेथे कामे सुरू आहेत. मात्र, मॅरेथॉन मार्गावरील खड्डे बुजविणे, अतिक्रमणे हटविणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
-२९ ऑगस्ट रोजी संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची पुन्हा पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
३० हजार स्पर्धकांच्या सुरक्षेवर भर
यंदा ३० हजारांहून अधिक नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. प्रत्येक सहभागीने सुरक्षितपणे स्पर्धेत सहभागी होऊन सुखरूप घरी परतावे, यावर प्रशासनाचा भर असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, शाळा, शिक्षक, बसचालक व स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यात आला आहे.
डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका सज्ज
मॅरेथॉनच्या ठिकाणी तसेच स्पर्धा मार्गावर आरोग्य विभागामार्फत १० डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका आणि ऑन-कॉल वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. तसेच मार्गावरील रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता विभागाने मार्गावरील शौचालये, फिरती शौचालये व स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली आहे.
२८ आणि २९ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयात स्पर्धकांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.
वाहतूक नियंत्रणावर पोलिसांचा ‘फोकस’
मॅरेथॉन सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धेच्या पूर्वसंध्येपासूनच पोलीस प्रशासनाकडून तयारी सुरू केली जाणार आहे.
मॅरेथॉनच्या दिवशी पहाटेपासून विविध ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक केले. शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी मार्गाच्या दुतर्फा स्वयंसेवक नियुक्त करण्याची सूचना त्यांनी केली.
समन्वयातून मॅरेथॉन यशस्वी करा
महापालिका, पोलीस प्रशासन आणि विविध विभागांनी समन्वयाने काम करून ठाण्याची ओळख ठरणारी मॅरेथॉन यशस्वी करण्याचे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले. यंदाची ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉफी टेबल बुक
यंदाच्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मॅरेथॉनच्या प्रवासावर आधारित कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात येणार आहे. मॅरेथॉनच्या मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी दिली.
