ठाणे : राज्याच्या राजकारणात नेहमी आपल्या राजकीय डावपेचाने विरोधकांना कोड्यात टाकणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथाॅनमध्ये धावत आश्चर्यचकीत केले. ठाण्याच्या रस्त्यावर रविवारी सकाळी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धावले आणि जिंकले देखील. निमित्त होत 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथाॅनच. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ त्यांचे महायुतीचे आमदार, नगरसेवक, ठाण्यातील अभिनेते देखील धावले. परंतु त्या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी मागे टाकले.
ठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी ठाणे वर्षा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथाॅनला सकाळी सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर देशभरातून आलेल्या धावपटूंनी धावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे देखील धावपटूंचे मनोबल वाढविण्यासाठी धावले.
शिंदे यांनी धावण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ महायुतीतील आमदार, नगरसेवक तसेच ठाण्यातील काही अभिनेत्यांनीही धाव घेतली. मात्र काही अंतर पार केल्यानंतर शिंदे यांनी वेग वाढवत सर्वांना मागे टाकले. राजकारणाच्या मैदानात आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे शिंदे रविवारी ठाण्याच्या रस्त्यावरही त्याच जोशात धावताना दिसले. त्यांच्या धावण्याला उपस्थितांनीही मोठा प्रतिसाद दिला. शिंदे यांना पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहरातील महत्त्वाच्या क्रीडा उपक्रमांपैकी एक मानली जाते. दरवर्षी या स्पर्धेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही विविध वयोगटांतील धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच ठाणेकरांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतल्याचे दिसले.
