ठाणे – ठाणे मनोरुग्णालयातील सफाई कामगारांच्या दोन वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. किमान वेतनाच्या फरकासाठी मोर्चे, धरणे, निदर्शने आणि तब्बल २८ दिवसांचे साखळी उपोषण केल्यानंतर ६८ सफाई कामगारांच्या खात्यात सहा महिन्यांच्या वेतन फरकाची रक्कम दुप्पट दंडासहित जमा करण्यात आली. सोमवारी प्रशासनाने ही रक्कम जमा केल्याने कामगारांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
ठाणे मनोरुग्णालयातील सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा केले जात नव्हते. यामुळे श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी गेल्या २ वर्षांपासून मोर्चा, धरणे, निदर्शने आणि २८ दिवसांचे साखळी उपोषण अशा विविध प्रकारे लढा दिला. ठाणे औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. परंतु रूग्णालय प्रशासन आणि ठेकेदार मे. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, पुणे यांनी न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत. यामुळे ६८ कामगारांचा किमान वेतनाच्या फरकाच्या थकीत रक्कम वसुलीसाठी ठाणे कामगार उपायुक्त कार्यालयात किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत वसुली दावा दाखल केला, अशी माहिती म्हश्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी दिली.
सुमारे वर्षभर वसुली दाव्याच्या प्रक्रियेनंतर, सहाय्यक कामगार आयुक्त तथा प्राधिकारी किमान वेतन अधिनियम यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी सहा महिन्यांच्या थकीत वेतन फरकाच्या रकमेच्या दुप्पट दंडासहित एकूण ५८ लाख रुपये आदेशाचे दिनांकापासून ४५ दिवसांत ठेकेदार यांनी अदा करावे. ठेकेदार यांनी ही रक्कम अदा केली नाही तर पुढील ६० दिवसांत मूळ मालक रूग्णालय प्रशासनाने हि रक्कम अदा करावी, असे आदेश पारित केले. परंतु ठेकेदार आणि प्रशासनाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही, असेही खैरालिया यांनी सांगितले. ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे औद्योगिक न्यायालयाचे ११ जून २०२४ चे आदेश आणि वसुली दाव्यात प्राधिकारी किमान वेतन अधिनियम १९४८ यांनी दिलेले आदेशाची अंमलबजावणी चार आठवड्यांत करण्याचे आदेश १६ एप्रिल २०२६ रोजी निर्गमित केले.
मुंबई उच्च न्यायालयात युनियन तर्फे वरिष्ठ अधिवक्ता गायत्री सिंह आणि सुधा भारद्वाज यांनी कामगारांची बाजू मांडली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामगारांना न्याय मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले. सहा सात वर्षे किमान वेतन कायद्यानुसार वेतनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व ६८ सफाई कामगारांना शेवटी सहा महिन्यांची वेतन फरकाची रक्कम दुप्पट दंडासहित रूग्णालय प्रशासनाने कामगारांच्या बॅंक खात्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी जमा केल्याने कामगारांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं आहे. लवकरच उर्वरित किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्याची आशाही निर्माण झाली आहे.
कायमस्वरूपी कामात कंत्राटीकरण रद्द होणे, कामगारांना योग्य वेतन व भत्ते हक्क म्हणून मिळणे आदी मुद्दे अद्याप बाकी असून, त्यासाठी कसून लढण्यास युनियन कटिबद्ध आहे, असे युनियनचे उपाध्यक्ष डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी सांगितले. रूग्णालयातील कर्मचारी व श्रमिक जनता संघ युनियनचे युनियनचे संघटक दीनानाथ देसले, अनिता कुंभावत, शर्मिला लोगडे, संजय सेंदाणे, सोनी चौहान या कार्यकर्त्यांनी या लढ्यात सातत्याने विशेष परिश्रम घेतले.
