Wadala Ghatkopar Kasarvadavali Metro Update: निवडणूकीपूर्वी गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मेट्रो चार मार्गिकेवर मेट्रो चाचणी करुन ठाणेकरांसाठी प्रकल्प कार्यान्वित होण्याची स्वप्न दाखविण्यात आली होती. मेट्रो आता दारातून धावणार अशी स्वप्न ठाणेकरांनी उराशी बाळगली होती. परंतु सात महिने उलटूनही ही मेट्रो घोडबंदर येथील मेट्रो रुळांवर धुळखात उभी आहे. त्यामुळे सकारच्या दाव्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून अद्याप परिचालनाचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे परिचालन होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे शहरात मागील २० वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकरण झाले आहे. घोडबंदर भागात गायमुखपर्यंत नव्याने गृहसंकुले उभी राहत आहेत. रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या अधिक यामुळे दररोज घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी होते. ही वाहतुक कोंडी सुटावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) प्रकल्प उभारला जात आहे. २०१६ पासून या प्रकल्पाचे काम सुरु असून ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खोदकामे झाली होती. त्यानंतर एमएमआरडीएने येथील सेवा रस्ता मुख्य रस्त्यात जोडणीची कामे देखील सुरु केली. या कामांमुळे घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडी अद्यापही कायम आहे. दरम्यान, १० वर्ष उलटत असतानाही मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे पूर्ण झाले नाही.
निवडणूकांपूर्वी म्हणजेच, सप्टेंबर २०२५ मध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच गायमुख ते कॅडबरी जंक्शन स्थानकाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच गायमुख भागात मेट्रोची चाचणी देखील करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता येथील पहिला टप्पा सुरु करणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु सात महिने उलटत असतानाही मेट्रो सुरु झाली नाही. कित्येक दिवस मेट्रो रुळांवर रेल्वे धुळखात उभी आहे. रस्त्यावरून वाहतुक करणारे चालक या मेट्रोकडे पाहून मेट्रो कशासाठी उभी करुन ठेवली असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मेट्रोची चाचणी केल्यानंतर किमान एक ते दोन महिन्यांत मेट्रो सुरु होईल असे आम्हाला वाटत होते. परंतु ही मेट्रो रेल्वे रुळांवर उभी आहे. ठाणेकरांना दररोज वाहतुक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. लोकार्पण करुन नेमके काय साध्य झाले हा प्रश्न आहे. – रोहीत पवार, रहिवासी, घोडबंदर.
याबाबत एमएमआरडीए विभागाला संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मेट्रोचे परिचालन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाचे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. या विभागाचे अधिकारी मार्गिकेची तपासणी करुन परिचालन करण्यास मेट्रो योग्य असेल तरच परिचालनाचे प्रमाणपत्र देते. अद्याप हे प्रमाणपत्र विभागाला प्राप्त झालेले नाही.
