Thane Metro Line 4 Delay Update: ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो चारची उभारणी केली जात आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चालवून त्याची चाचणी करण्यात आली. परंतु चाचणीनंतर नऊ महिने उलटले असतानाही ही मेट्रो धुळखात असल्याचे चित्र आहे. मागील नऊ महिन्यांपासून ही मेट्रो रुळांवर उभी असल्याने नागरिकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून परिचलनासाठी अद्याप प्रमाणपत्र मिळाले नसल्याने ही मेट्रो रुळांवरच उभी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्याच्या पहिल्या मेट्रोची धाव ठाणेकरांना सध्यातरी धूसर दिसत आहे.

ठाणे शहरातून थेट वडाळा आणि घाटकोपर गाठता यावे, मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुखर व्हावा, मध्य रेल्वेचा प्रवासी ताण कमी करता यावा यासाठी मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाणे शहरात सुरु आहे. मागील १० वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरु असल्याने ठाणेकरांना प्रकल्पाच्या कामांमुळे सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. एकूण ३२.३२ किमी मार्गिकेचा हा प्रकल्प उन्नत असून ३० मेट्रो स्थानकांचा यामध्ये सामावेश आहे. २०१६ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर सहा ते सात वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावा सरकार करत होती. पंरतु १० वर्ष उलटत असतानाही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.

घोडबंदर भागातील मेट्रो स्थनकांची कामे सुरु झाल्यानंतर जून २०२५ मध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन होते. त्यानंतर येथील मेट्रोच्या रुळांवर मेट्रोचे डबे देखील उभे झाले. सप्टेंबर २०२५ मध्ये मेट्रो प्रकल्पाची चाचणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम पार पडला. घोडबंदर भागातील अनेक रहिवाशांच्या मनात आता मेट्रो सुरु होणार अशी आशा निर्माण झाली होती. एक ते दोन वेळा या रिकाम्या मेट्रोच्या फेऱ्या देखील झाल्या. त्यामुळे मेट्रो धावणार असे वाटत होते. परंतु नऊ महिने उलटत असतानाही मेट्रो रुळांवरुन धावली नाही. येथील घोडबंदर भागातील काही स्थानकांतून ही मेट्रो सुरु केली जाईल असा दावा सरकारकडून केला जात होता. परंतु हा दावा देखील फोल ठरत असल्याचे दिसते.

मेट्रोच्या परिचलनासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून प्रमाणपत्र आवश्यक असते. आयोगाकडून येथील सुरक्षितता तसेच इतर तांत्रिब बाबी तपासल्या जातात. परिचालनास योग्य असल्यास आयोगाकडून अहवाल दिला जातो. या मेट्रोसाठी अद्यापही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अहवाल प्राप्त नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अद्यापही ही मेट्रो धुळखात असल्याचे दिसते.

याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागास संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.