Mumbai Pune Expressway Accident Impact: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना बुधवारी घडली. या कोंडीत अनेक दुध पुरवठा करणारी वाहने अडकून पडली. अनेक वाहने शहरात येण्याऐवजी पुन्हा माघारी परतली. परिणामी, या भीषण कोंडीचा फटका नागरिकांसह दुग्धव्यवसायालाही बसला. ठाणे शहरात गुरूवारी सुमारे ५० टक्के दुधाचा पुरवठा झाला असून यामुळे शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर दूध पुरवठा केला जातो. या भागांतील विविध दुध डेअरीमधून दूध पिशव्या विक्रीसाठी शहरात पाठविल्या जातात. तसेच दुधाचे टँकर मुंबई तसेच नवी मुंबईतील डेअरी केंद्रांमध्ये दररोज येतात. ही सर्व वाहने मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गाद्वारे ठाण्याच्या दिशेने येतात. बुधवारी द्रुतगती मार्गावरील अपघातामुळे या सर्व वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अनेक गाड्या कोंडीत अडकून पडली. तर काहीजण शहरात येण्याऐवजी तेथूनच माघारी परतले. काही मोजक्याच गाड्या पर्यायी मार्गाने शहरात पोहोचू शकल्या. त्यामुळे शहरात पुरेसा दुध पुरवठा होऊ शकलेला नाही.

ठाणे शहरात दररोज सरासरी साडेपाच ते सहा लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. मात्र अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडीत दुध वाहने अडकल्याने शहरात निम्माच दुध पुरवठा गुरुवारी सकाळी झाला. परिणामी शहरातील किरकोळ विक्रेते, दूध विक्री केंद्रे तसेच हॉटेल व्यवसायिक यांच्यासमोर मोठी अडचण उभी राहिली. सकाळच्या वेळेत अनेक भागांत दूध उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. काही ठिकाणी मर्यादित प्रमाणातच दूध विक्री करण्यात आली. या संपूर्ण परिस्थितीमुळे शहरात तात्पुरता दुधाचा तुटवडा निर्माण झाला असून पुढील काही दिवस पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे अनेक दूध टँकर शहरात येऊ शकले नाहीत. त्यामुळे शहरात सुमारे ५० टक्के दूध कमी आले. ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्येही अशीच अवस्था आहे. अनेक दुध टँकर हे नवी मुंबईतील महानंदा, गोकूळ आणि वारणा डेअरीमध्ये येतात, परंतु नेहमीपेक्षा कमी दुध टँकर आल्याने दुधाचा तुटवडा निर्माण झाला, अशी माहिती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली.