ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील शालीमार ढाब्यावर ग्राहकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून या गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या ढाब्याच्या व्यवस्थापकाला देखील मारहाण झाली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुंबई नाशिक महामार्गालगत ठिकठिकाणी ढाबे आहेत. रात्री या ढाब्यांवर जेवण्यासाठी, पार्ट्यांसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. शनिवारी रात्री या ढाब्यावर एक गट पार्टीसाठी आला होता. जेवत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला केला की, त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. काहींनी लाठ्याकाठ्या घेत एकमेकांना मारहाण सुरू केली. या प्रकारामुळे ढाब्यावर आलेल्या इतर ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. ढाब्यावरील व्यवस्थापक वाद सोडविण्यासाठी गेला असता, त्यालाही या गटाने मारहाण करण्यास सुरूवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या भिवंडी तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हाणामारी सुरु असताना एका व्यक्तीने या प्रकाराचे चित्रीकरण केले होते. हे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य समोर आले आहे. याप्रकरणी आता भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हाणामारीत ढाब्यातील साहित्याचेही नुकसान झाल्याचे कळते आहे. पोलिसांकडून चित्रीकरण तपासले जात आहे. गोंधळ घालणारे तरुण कोठून आले आहेत, त्यांनी हा प्रकार नेमका कशामुळे केला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.