ठाणे – दिवाळीच्या सणात नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी स्टेम कंपनीने ठाणे, मिरा-भाईंदर आणि भिवंडी शहरांसह ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील २ आणि ९ नोव्हेंबर रोजीचे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन रद्द केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात येथील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नसून त्यांना जलदिलासा मिळाला आहे.

एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी आणि ठाणे महापालिकेची स्वत:ची योजनेने सुरू केली आहे. यामुळे आठवड्यातून २४ ते ३६ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असून यानंतर एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरांमधील संकुले टँकरने पाणी विकत घेत आहेत. सुरूवातीला दर बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तो बदलून दर सोमवारी पाणी बंदचा निर्णय घेण्यात आला होता.

यानुसार, ऐन दिवाळीत म्हणजेच, २ आणि ९ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात ही कपात रद्द करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर स्टेम कंपनीने २ आणि ९ नोव्हेंबर रोजीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात ठाणे, मिरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिका तसेच ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. दरम्यान, १६ नोव्हेंबरपासून पुन्हा दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये १६, २३ आणि ३० तारखेला, तर डिसेंबरमध्ये नियोजित तारखांना पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकांनी केले आहे.

ठाणे पालिकेच्या योजनेतील कपात रद्द

ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत १८ तासांचा शटडाऊन घेण्याचे नियोजन होते. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारऐवजी दर सोमवारी सकाळी ९ ते मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पाणी बंदचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दिवाळीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी स्टेम कंपनीप्रमाणेच पालिकेच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा २ आणि ९ नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली.