ठाणे : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील ठाणे-पालघर मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाने माजी आमदार रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर झाली. सोमवारी रविंद्र फाटक हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात आल्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन
रस्त्याच्या कडेला महागडी वाहने उभी केल्याने त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला. चिंतामणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच खारटनरोड, बाजारपेठ मार्ग या पर्यायी रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. उन्हाचे चटके सहन करत वाहन चालकांना प्रवास करावा लागला. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. दुपारी २ नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविंद्र फाटक यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. शिंदे आल्यानंतर गर्दीत वाढ होऊन कोंडीत आणखी भर पडली.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटल्यानंतर या निवडणुकीत शिंदे गटाने अधिकृत उमेदवार म्हणून रविंद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर केली. सोमवारी सकाळी रविंद्र फाटक हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद मठात येणार असून त्यानंतर उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर सकाळपासून शिंदे गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या महागड्या वाहनांनी टेंभीनाका परिसरात आले होते.
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी टेंभीनाका चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. कोर्टनाका, जिल्हाधिकारी कार्यालय, रुग्णालय या परिसरात आहे. त्यामुळे या भागात लाखो नागरिक ये-जा करत असतात. हा मार्ग अरुंद असल्याने दररोज येथे वाहतूक कोंडी होत असते. सोमवारी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची वाहने अरुंद रस्त्यालगत उभी केल्याने त्याचा परिणाम संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर बसला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी टेंभीनाक्यातील आनंद मठात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे टेंभीनाका परिसरात मोठी गर्दी झाली होती.
याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला. सकाळी १२ वाजेपासून वाहतूक कोंडीस सुरुवात झाली होती. टेंभीनाका मार्गावर चिंतामणी चौक ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळी संविधान चौका पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. काही वाहन चालकांनी खारटन रोड, बाजारपेठ परिसरातून वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पर्यायी मार्गावर भार येऊन तेथील मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. स्थानक परिसरात वाहतूक करणारे रस्ते वाहतूक कोंडीत असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.
