ठाणे : ठाणे -पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने शिंदे सेनेचे उमेदवार रविंद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रंगतदार लढतीची शक्यता संपुष्टात येत निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीला बिनविरोधचे चित्र होते. मात्र, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अटळ मानली जात होती.

या निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजपकडे मिळून सुमारे ७९० मतांचे संख्याबळ होते, तर महाविकास आघाडीकडे अवघी १३० मतांची बेरीज होत होती. त्यातही मतफुटीची शक्यता निर्माण झाल्याने निवडणूक लढविण्यापेक्षा पराभव टाळण्याला प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपमधील नाराज मतदारांच्या जोरावर ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत रंगत आणण्याचे गणित राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने आखले होते. मात्र महाविकास आघाडीतीलच काही मतदार फुटण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी अखेर उमेदवार अभिजित पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे शिंदे सेनेचे उमेदवार रविंद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजकीय समीकरणे बदलली

महाविकास आघाडीकडून भाजपमधील असंतोषावर भिस्त ठेवण्यात आली होती. मात्र स्वतःच्या गोटातील मतदारांमध्येच अस्वस्थता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणे बदलली आणि ठाण्याची ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली जाते. मात्र या निवडणुकीत आमच्या बाजूने आवश्यक संख्याबळ नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविण्यापेक्षा संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पक्ष विस्तारासाठी काम केले जाईल. त्यामुळेच उमेदवारी मागे घेण्यात आली.– मनोज प्रधान, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), ठाणे</strong>