ठाणे : मुंबई शहरात मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता ठाणे शहरातील धोकादायक प्रवासाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, (एमएमआरडीए), राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीसी) ठिकठिकाणी खोदकामे केली आहेत. मात्र, या कामांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत नसल्याने मुख्य रस्ते आणि महामार्गांवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर मार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावरून हजारो जड-अवजड वाहने, हलकी वाहने वाहतूक करतात. तसेच बसगाड्या, एसटी यांसारख्या वाहनांची वाहतूकही अधिक होते. हे मार्ग अनेक शहरांना जोडतात. गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात मेट्रो मार्गिका, घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख येथील सेवा रस्त्यांचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडून राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर ठाणे येथील माजिवडा ते भिवंडीतील वडपे दरम्यान सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम ‘एमएसआरडीसी’कडून सुरू आहे. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेला नाही.

दरम्यान, अपूर्ण प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकामे करण्यात आली असून अनेक ठिकाणी खोल खड्डे उघडेच ठेवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी या खड्ड्यांभोवती संरक्षक कठडे, लोखंडी अडथळे किंवा इशारा फलक लावलेले नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर ठाणेकरांमध्येही भितीचे वातावरण आहे. चौकट या खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून त्यामुळे डासांची पैदास होण्याचा धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

चौकट माजिवडा वडपे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम ज्या ठिकाणी शिल्लक आहे, तेथे वाहतूक साहाय्यक तसेच इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक असते. ज्या ठिकाणी अडथळ्यांची आवश्यकता आहे. तेथे अडथळे उभारण्यात येतील. – रमेश खिस्ते, अधीक्षक अभियंता, एसएसआरडीसी.

याबाबत ‘एमएमआरडीए’ विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.