scorecardresearch

ठाणे : रस्त्यावरील भंगार गाड्या हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश, १४ भंगार गाड्या पालिकेने हटविल्या

आदेशानंतर पालिकेच्या पथकाने मुलुंड चेक नाका आणि श्रीनगर भागातील रस्त्यावर उभी असलेली १४ वाहने हटविण्याची कारवाई केली आहे.

abhijit bangar order remove junk cars
ठाणे : रस्त्यावरील भंगार गाड्या हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर वर्षोनुवर्षे उभ्या असलेल्या भंगार गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असून, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्त्यावरील भंगार वाहने हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने मुलुंड चेक नाका आणि श्रीनगर भागातील रस्त्यावर उभी असलेली १४ वाहने हटविण्याची कारवाई केली आहे.

ठाण्यातील श्रीनगर पोलीस चौकी येथील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून भंगार अवस्थेतील चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या आहेत. या गाड्यांमुळे परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना येथून चालणे शक्य होत नाही. शिवाय, या परिसराची स्वच्छता करणे त्रासाचे होत आहे. अशा स्वरुपाच्या तक्रार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त बांगर यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जागा मोकळ्या असणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भंगार अवस्थेतील गाड्या उभ्या केलेल्या असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे, रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेतील गाड्या नजरेस पडल्या तर त्या तात्काळ उचलण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश आयुक्त बांगर यांनी संबंधितांना दिले आहेत.

हेही वाचा – कल्याणमध्ये एस.टी. बस चालकाला बेदम मारहाण, रेल्वे तिकीट तपासणीसाला शिवीगाळ

हेही वाचा – ठाण्यातील खाडीकिनारी मार्गातील अडथळा दूर; बाधित वन जमिनीच्या बदल्यात चंद्रपुरमध्ये जागा देणार

या आदेशानंतर परिमंडळ २ चे उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलुंड चेक नाका आणि श्रीनगर भागातील रस्त्यावरील भंगार गाड्या उचलण्याची कारवाई केली. यामध्ये ४ चारचाकी गाड्या आणि दहा दुचाकींचा समावेश असून, ही वाहने बाटा कंपउंड येथे ठेवण्यात आली आहेत. या कारवाईमुळे या रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या शौचालयांची नव्याने पुर्नबांधणी केली जाणार असून श्रीनगर पोलीस चौकी परिसरही सुशोभित केला जाणार असल्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण शहरात वेळोवेळी ही कारवाई सुरू रहावी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तिन्ही परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 16:32 IST
ताज्या बातम्या